लक्ष्मीदहिवडी / दत्तात्रय नवत्रे
मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश डाळिंब बागांमध्ये सध्या तेल्या या रोगाने थैमान घातले असून या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकर्यांची झोप उडाली आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी शासनाकडून काही ठोस उपाययोजना होतील का? किमान या रोगावर ठोस औषध तयार होईपर्यंत नुकसान होणार्या बागांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अत्यंत कमी पाण्यावर येणारे डाळिंब हे पिक असल्याने या दुष्काळी भागातील अनेक शेतकरी डाळिंब शेतीकडे वळले आहेत कमी पाण्यावर व कमी खर्चात अगदी मा ळरानावरही चांगल्या प्रकारे हे पिक येत असल्याने या पिकाने गेल्या काही वर्षात गरीबातील गरीब शेतकर्यांनाही मालामाल केले आहे. पण, सध्या धरलेल्या बागांवर तेल्या रोगाचा जास्त प्रमाणात शिरकाव झाल्याने अनेक बागा फेल गेल्या आहेत. काही शेतकरी तर दररोज एक दुकानदार सांगेल ते औषध फवारत आहेत, मात्र या रोगावर नियंत्रण येत नसल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.तेल्या रोग आल्यापासून अनेक दुकानदार मात्र मालामाल झाल्याचे दिसत आहेत. शेतकर्यांना या औषधाने तेल्या रोग नियंत्रणात येतो म्हणून अनेक औषधे खपवली जात असून त्या औषधाने नियंत्रण झाले नाही म्हणून परत शेतकरी दुकानदाराकडे गेल्यास वातावरणात बदल झाल्याने औषधाने काम केले नाही. या वातावरणात आता 'हे' दुसरे औषध घेऊन जा, म्हणून दुकानदारांकडून शेतकर्यांना लुबाडण्याचे काम सुरू आहे.दुकानदाराने दिलेल्या औषधाने हा रोग नियंत्रणात येत नसल्याने अनेक शेतकर्यांनी स्वत:ही प्रयोग करून पाहिले आहेत. यामध्ये तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी काही शेतकर्यांनी दूध, ताक, हिरव्या मिरच्यांचा रस, कडुनिंबाच्या झाडाच्या पानाचे रस, अंडी, निरमा, साबणाचे पाणी, देशी दारू अशा अनेक प्रकारच्या फवारण्या करून शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मात्र, कशाचाच गुण येत नसल्याने आता शेतकर्याने हात टेकले आहेत. या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून त्वरित उपाययोजना झाली तरच डाळिंब बागा वाचू शकणार आहेत. अनेक अडचणींवर मात करून शेतकरी बागा जपत आहेत. मात्र, या रोगामुळे हातातोंडाला आलेला घास वाया जात आहे. तेल्या रोगामुळे तालुक्यातील बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या शेतकर्यांना आतापर्यंत केलेल्या खर्चाचा आर्थिक भुर्दंड बसणारच आहे. या बागांचे पंचनामे करून तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे यांनी शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रय▪करावेत, अशी मागणी फळबाग शेतकर्यांतून होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment