गोहाना :
हरियाणातील गोहाना येथील जिंद रोडस्थित पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेवर धाडसी दरोडा पडल्याचे सोमवारी प्रकाशझोतात आले. दरोडेखोरांनी तब्बल दीडशे फूट लांबीचा ७ फूट खोल आणि अडीच फूट चौपट असा बोगदा खोदून बँकेतील ८९ लॉकर्स फोडत कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला. रोकड, दागिने आणि इतर मौल्यवान सामान चोरट्यांनी लांबविले आहे. पोलीस अधिकारी राजीव देसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या शहरातील बसस्थानकाजवळच्या पीएनबीच्या शाखेत रविवारची सुट्टी लक्षात घेता दरोडेखोरांनी बँकेची तिजोरी साफ केली. सोमवारी बँक उघडली असता दरोडा पडल्याचे समोर आले. या चोरीमुळे बँकांमधील लॉकरमध्ये जमा स्वरूपातील कोट्यवधी रुपयांच्या ऐवजाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांची चार पथके, श्वान आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांचा चमू घटनास्थळी दाखल झाला. बोगदा खोदलेल्या शेजारच्या एका जुनाट इमारतीच्या मालकाचीही पोलीस चौकशी करीत आहेत. देसवाल पुढे सांगतात की, दरोडेखोरांनी जमिनीत तब्बल १५0 फुटांचा बोगदा खोदला. हा बोगदा थेट बँकेच्या लॉकर रूमपर्यंत जातो. त्यानंतर कोट्यवधी रुपयांचा ऐवज आणि इतर वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या.
Post a Comment