0

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने युवकांचा समुह पाठिशी असणारे 'स्वाभिमान' सामाजिक संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे संघटक सागर यादव यांनी अखेर या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभा करण्याचा निर्णय गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. यादव यांनी आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी मागील आठवड्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेवुन विचार विनिमय घेतला होता. त्यामध्ये कार्यकर्त्यांची भुमिका जाणुन घेवुन सुशिक्षित आणि युवकांबद्दल आशा असलेले शिवसेनेचे उमेदवार उदय़ोजक समाधान अवताडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये जाहिर करण्यात आला. हा पाठिंबा कोणत्याही राजकिय पक्षाकडे बघुन दिला नसुन व्यक्तीला पसंती देत आपण आपल्या कार्यकर्त्यांची फौज समाधान अवताडे यांच्या विजयासाठी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनेक वर्षापासुन पंढरपूरचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. बाहेरून येणार्‍या भाविकांसाठी सुविधा नाहीत. यासाठी सध्या निवडणुक रिंगणात असलेले आ.भारत भालके आणि प्रशांत परिचारक हे दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे आपण हा निर्णय जाहिर केला आहे. युवकांना नोकर्‍या नाहित यामुळे कोरी पाटी असलेले अवताडे हे स्वत: उद्योजक असुन ते युवकांना नोकरी देण्याच्या दृष्टीने नक्की पाउल उचलतील या अपेक्षेने आपण पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर तालुक्याला मागील वेळेस लोकप्रतिनिधीत्व मिळाले आहे. त्यामुळे एकदा मंगळवेढेकरांना संधी दिली पाहिजे या भुमिकेनेही आपण अवताडे यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूरातील अनेकांचे जनजीवन हे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अवलंबुन आहे. त्यामुळे भाविकांचे प्रमाण वरचेवर वाढावे यासाठी पंढरपूर शहरामध्ये सर्व सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत हि आपली भुमिका आहे परंतु, आलेल्या भाविकांना या सुविधा उपलब्ध होत नसल्याने येणारा भाविक पंढरपूरची माहिती सुविधाअभावीचे पंढरपूर अशीच सांगत जात असतो. त्यामुळे येत्या काळामध्ये या सुशिक्षित आणि धाडसी नेतृत्वाकडुन हि सर्व कामे नक्की मार्गी लागतील याची आपणाला खात्री असल्यामुळे आपण अवताडे यांना पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा कुणाला पाडण्यासाठी नसुन तो विकासासाठी दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

 
Top