धूम स्टाईल दुचाकी ही रत्नागिरीतील मोठी समस्या बनली आहे. पूर्वी ही किरकोळ बाब मानली जात होती. आता मात्र याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे बनले आहे. कारण शहरात दररोज सायंकाळी गर्दीच्यावेळी भर बाजारपेठेतून शर्यती लावण्याचे नियमित प्रकार सुरू झाले आहेत. पोलीस प्रशासन मात्र हातावर हात ठेवून गप्प आहे. त्यामुळे हे प्रकार रोखणार कोण? असा प्रश्न आहे. वाहतूक संदर्भातले नियम कठोर आहेत. मात्र त्याचे पालन केले जात नाही. हल्लीच वाहतूक शाखेने नियम मोडल्यास दंडाच्या रकमेतही वाढ केली आहे. यात सार्वजनिक रस्त्यावर वाहनाची गती किती असावी, याबाबतही नियम आहेत. मात्र रत्नागिरी शहरात सायंकाळी ७ ते ९ यावेळेत प्रमुख रस्त्यांवरून वेगवान दुचाकींच्या झुंडीच्या झुंडी जाताना पाहिल्यावर रत्नागिरी शहराला हे नियम लागू होतात का? असा प्रश्न पडतो. रत्नागिरी शहरात मिरकरवाडा येथून एकाचवेळी दहा ते पंधरा दुचाकीस्वार आपल्या आधुनिक दुचाकी घेऊन एकाचवेळी बाहेर पडतात. प्रचंड वेगाने या दुचाकी मजगाव रस्त्याच्या दिशेने धावतात. याचदरम्यान मोठय़ा प्रमाणात लोक घराकडे जात असल्याने रस्त्यावरती वाहनांची गर्दी असते. पुरूषांबरोबरच महिलाही मोठय़ा प्रमाणात असतात. अचानकपणे मागून येणार्या दुचाकींच्या टोळधाडीमुळे या स्वारांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडते. आजवर यातून फार मोठी दुर्घटना झाली नसली तरी छोटे अपघात रोजच होत आहेत. धडक देणारे न थांबता निघून जात आहेत. प्रौढ आणि महिलावर्गासाठी यासाठी रस्त्यावरून वहाने चालवणे अत्यंत जिकरीचे बनले आहे. हा प्रकार पाहता आपण रत्नागिरी शहरातले हे दृश्य पाहतो आहे की नक्षलवादी भागातले, असा प्रश्न निर्माण होतो. रस्त्यावरून वाहन चालवताना नियम सर्वांसाठी सारखे असतात. मात्र रत्नागिरीत पोलीसांची वाहतूक शाखा आजवरतरी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे. सर्वसामान्य लोकांनाही बेलगाम दुचाकीस्वार दिसत असतील तर पोलीसांना का दिसत नाहीत, असा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. अर्थात एखादा गुन्हा रोखायचा असेल किंवा त्याच्या मुळात जाऊन गुन्हेगारी संपवायची असेल तर पोलीसांनी मनावर आणल्यास त्यांना अशक्य काही नाही. मात्र आजवर 'मनावर' घेतले गेले नाही, हे ही तितकेच खरे. काही प्रामाणिक वाहतूक पोलीसांनी अशा दुचाकीस्वारांना अडवण्याचे प्रय▪केले खरे मात्र हे दुचाकीस्वार पोलीसांना जुमानतच नाहीत. थांबण्याचे सौजन्यही दाखवत नाहीत. त्यांचा पाठलाग करण्याइतकी आधुनिक वाहने पोलीसांकडेही नाहीत. यातूनही एखाद्याला पकडलेच तर तो राजकीय दबाव आणून स्वत:ची सुटका करून घेतो. अनेकदा महागडी गाडी चालवणारा बड्या बापाची अवलाद असते. तो पोलीसांनाच घाबरवून तिथून निघून जातो. दुसर्या दिवशी आणखी वेगाने गाडी चालवतो. शर्यत लावण्याच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी हा विषय आव्हान म्हणून स्वीकारल्यास धनदांडग्यांच्या अवलादांची मस्ती जिरवणे अवघड नाही. मात्र त्यासाठी कठोर अभियानाची गरज आहे. वाहतूक सुरक्षेचा सप्ताह पाळून पुरेसे नाही. वर्षाचे ३६५ दिवस सुरक्षेची गरज आहे. त्याकरता एखाद्या गंभीर दुर्घटनेची वाट पाहू नये. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांमध्ये संताप निर्माण होऊ शकतो आणि त्यातून कायदा, सुव्यवस्था बिघडू शकते. येत्या काही दिवसांत असे घडूही शकते. यामुळे हा प्रकार आता गांभीर्याने घ्यायला हवा. मुंबई-पुण्यासारख्या शहरात वाहतुकीचे नियम पाळले जातात. तिथेही बड्या बापांची बिघडलेली अवलाद नियम पाळते मग रत्नागिरीसाठी वेगळे निकष कशाकरता?
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment