0

पंढरपूर तालुका पोलिसांचा नवा फंडा; छेड काढल्यास एस.टी.तच मिळणार 'प्रसाद'
पंढरपूर / शहर प्रतिनिधी
चळे पाटी (ता.पंढरपूर) येथे दोन दिवसात दोन शाळकरी मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्यानंतर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याविषयी पालकांमधून अस्वस्थता पसरल्याने तालुका पोलिसांनीही 'रोमिओं'वर 'वॉच' ठेवण्याचा रामबाण उपाय शोधला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांबरोबर साध्या वेशातील पोलीस एस.टी. बसने प्रवास करून असा प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ 'रोमिओंना' जागेवरच 'प्रसाद' देणार आहेत. पंढरपुरात संपूर्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातून विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षणासाठी येतात. बहुतांश विद्यार्थी एस.टी. बसमधून ये-जा करीत असल्याने सकाळ आणि सायंकाळच्या सर्वच एस.टी. गाड्यांमध्ये खचाखच गर्दी असते. मात्र, याचाच गैरफायदा घेत कांही टवाळखोर, रोडरोमिओ शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थींनींशी छेडछाड करीत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. पंढरपूर-ओझेवाडी या मार्गावरील चळे पाटी येथे मंगळवारी (दि.१८) भरदुपारी १0 वर्षाच्या शाळकरी मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रय▪आंबे येथील तरूणाने केला. यानंतर गुरूवारी (दि.२0) पुन्हा याच ठिकाणी चालत्या एस.टी. बसमध्ये तिघांनी एका मुलीची छेड काढत विनयभंग केला. या प्रकाराने शिक्षणासाठी प्रवास करणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकवर्ग हादरून गेला आहे. या घटना अतिशय गांभियाने घेत तालुका पोलिसांनी चक्क रात्रभर शोधमोहीम राबवून संबंधित 'रोमिओंना' गजाआड केले. याविषयी तालुक्यात पोलिसांविषयी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. यावरच न थांबता तालुका पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी शुक्रवारी (दि.२१) थेट विद्यार्थी, प्रवाशांमध्ये मिसळून अशा प्रवृत्तींना लगाम घालण्याचा नवा फंडा राबविण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत स्वत: जाधव यांनी गुरूवारी सकाळी १0 वाजता पंढरपूर-ओझेवाडी या एस.टी.ने प्रवास करून विद्यार्थ्यांच्या एकंदर हालचालींचा अंदाज घेतला. यादरम्यान दस्तुरखुद्द जाधव यांनाही कांही विद्यार्थ्यांच्या 'टारगटपणाची' प्रचिती आली. शिक्षणासाठी ये-जा करीत असताना मुलींना छेडछाड, अश्लील शेरेबाजी, हावभाव अशा गोष्टींचा त्रास होवू नये तसेच ग्रामीण विद्यार्थीनी आणि पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम रहावी याची पुरेपूर काळजी घेण्याचा निर्णय पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी या प्रवासानंतर घेतला आहे. त्यासाठी ओझेवाडी, खर्डी, सिध्देवाडी, भाळवणी, सोनके, फुलचिंचोली आदी मार्गांवरून विद्यार्थी वाहतूक होणार्‍या एस.टी.बसमध्येच एक महिला व एक पुरूष पोलीस कर्मचारी साध्या वेशात तैनात करण्यात येणार असून अधून-मधून हा फंडा सर्वच मार्गांवर अवलंबला जाणार असून छेडछाडीचा प्रकार निदर्शनास येताच संबंधित रोमिओंना जागेवरच 'प्रसाद' मिळण्याची व्यवस्था केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top