0
सोलापूर / सुमित वाघमोडे
 इंग्रजांच्या काळातही महत्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूरात १८६0 पासून जिल्हाधिकारी पदाची नेमणूक करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ७८ जिल्हाधिकारी होवून गेले तुकाराम मुंढे हे ७९ वे जिल्हाधिकारी आहेत. चार जिल्हाधिकार्‍यांची दोनदा नेमणूक झाली आहे. त्यामुळे ७५ जणांनीच जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्वातंत्र्यापूर्वी एल.जी. देशमुख हे एकमेव भारतीय जिल्हाधिकारी होवून गेले. काही जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने सोलापूर शहरात चौक व पेठाही आहेत. भारतावर इंग्रजांचे राज्य असतानाही सोलापूरची विशेष अशी ओळख होती. दक्षिण भारताला जोडणारे गाव म्हणून सोलापूर ओळखले जात. त्याच बरोबर व्यापारातही सोलापूरचा मोठा वाटा होता. श्री सिध्दरामेश्‍वरांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकही सोलापूरात येत असत. इंग्रजांचेही विशेष लक्ष सोलापूरवर असल्याचे जाणवते. १८६0 सालापासून सोलापूरात जिल्हाधिकार्‍यांची नेमणूक करण्यास सुरुवात झाली. तसा इतिहास जिल्हाधिकारी कार्यालयात मिळतो. सर्व जिल्हाधिकार्‍यांच्या नावांची पाटी आणि साल अजूनही पहायला मिळते. त्या अगोदरच्या काळात जिल्हाधिकारी होते का याबाबत मात्र पुरावे सापडत नाहीत. डब्लू.ए. गोल्डफिंच हे पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांच्या नावाने नवी पेठेजवळ गोल्डफिंच पेठही आहे. तर सतरावे जिल्हाधिकारी ए.एफ. मॅकेनिकी यांच्या नावे मॅकेनिकी चौकही आहे. ए.एच. स्प्रे, डी. सिमंगटन, पी.एन. डॅमरी आणि डब्लू. एच. बख्तियार अशा चार जिल्हािधकार्‍यांची दोन वेळेस नियुक्ती झाली आहे. त्याच बरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात एल. जी. देशमुख हे एकमेव भारतीय जिल्हाधिकारी होते. १९४७ साली म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर जी.एल. क्रॉस्टिवेट हे सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. एस.पी. घाटे हे स्वतंत्र भारतातील सोलापूरचे पहिले जिल्हाधिकारी होते. २00४ साली नियुक्त झालेल्या मनिषा वर्मा या एकमेव महिला जिल्हाधिकारी आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या १९७0-७२ नंतरच्या जिल्हाधिकार्‍यांचा कालखंड आणि त्यांचे काम आजही अनेकांच्या स्मरणात आहे. १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळावेळी ए.एन. बटब्याळ हे सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सर्मथपणे पेलली. लोकांना व जनावरांना जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. पी.डी. करंदीकर आणि व्हि.एन. करंदीरकर या दोन्ही जिल्हाधिकार्‍यांची अभ्यासू म्हणून ओळख होती. रत्नाकर गायकवाड यांचे काम अजूनही नागरिकांच्या लक्षात आहे. त्यांनी विकासकामव्दारे संपूर्ण जिल्हा हलवून सोडला होता. एका गावात रात्रीचा मुक्काम करुन तेथील समस्या जाणून घेण्याचा पहिला प्रयोग त्यांनी सोलापूरात केला. १९९३ साली लातूरला मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी डी.के. जैन हे सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी सर्व सुत्रे सोलापूरातून हलत होती. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांचा सोलापूरात आठ दिवस मुक्काम होता. त्यावेळी जैन यांनी संपूर्ण प्रशासन भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी लावले होते. प्रविणसिंह परदेशी, दिपक कपूर यांनीही जिल्हाधिकारी म्हणून छाप पाडली. मनिषा वर्मा यांचा रोख अतिक्रमणे काढण्यावर होता. तसेच त्यांनी उत्तर तहसिल कार्यालय कंकुबाई इमारतीत हलविले. के. गोविंदराज यांनी सोलापूर महोत्सव सुरु केला. जगदिश पाटील यांच्या काळात सोलापूरच्या पर्यटनाच्यादृष्टीने चांगले काम झाले. नुकतेच बदलून गेलेले डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाला शिस्ततर लावलीच परंतु सोलापूरचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला. घोटाळयांचा जिल्हा ही ओळख पुसून नविन योजना आखणारा जिल्हा म्हणून लौकिक मिळवून दिला.           

Post a Comment

 
Top