विवेक इनामदार, एबीपी माझा,
पुणे:
शाळेतील विद्यार्थीनींशी आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या लिपिकाला दामिनी ब्रिगेडच्या महिलांनी आज चांगलाच चोप दिला. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर भागातील एका शाळेत घडला. बाळासाहेब चौधरी असे या लिपिकाचे नाव आहे. बाळासाहेब चौधरी हा वारंवार कार्यालयात बोलावून मुलींशी गैरवर्तन करीत असल्याचा शाळेतील विद्यार्थीनींचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून हा लिपिक शाळेतील मुलींशी गैरवर्तन करीत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शाळेतील चार ते पाच विद्यार्थिनी यापूर्वी शाळा सोडून गेल्या आहे. या प्रकाराची माहिती विद्यार्थिनींनी वारंवार देऊनही शाळा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, असे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. शाळा या गंभीर गोष्टीची दखल घेत नसल्याने संबंधित मुलींच्या पालकांनी दामिनी ब्रिगेडशी संपर्क साधला. दामिनी ब्रिग्रेडच्या महिलांनी आज (शुक्रवारी) दुपारी शाळेत येऊन या लिपिकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. लिपिकाकडून होत असलेल्या कथित गैरवर्तनाबद्दल विद्यार्थिनींकडून यापूर्वी तक्रार आली नसल्याचा दावा शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment