संतांची अशी ओळख असणार्या मंगळवेढा तालुक्यात अनेक दैवतांच्या यात्रा मोठय़ा प्रमाणात भरवल्या जातात. त्यामध्ये हुलजंती, माचणूर, मातृलिंग, लक्ष्मीदहिवडी, हून्नूर आदी गावांमध्ये दरवर्षी मोठमोठय़ा यात्रांचे आयोजन केले जाते. या यात्रांमुळे गावोगावी आर्थिक उलाढाल वाढून ग्रामीण व शहरी भागातील जनतेला व त्यांच्या नातेवाईकांना एकत्रित आणण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून होत असते.
अनेक गावांमध्ये यात्रेनिमित येणारे नागरिक त्या-त्या परिसरातील व बाहेरील गावातील असतात. यात्रेच्या काळात गावातून आधीच यात्रेची तयारी मोठय़ा प्रमाणात सर्व नागरिक एकत्रित येऊन करतात. यात्रेनिमित्त येणारे भाविक यात्रेमध्ये आलेली विविध प्रकारचे खेळणी, विविध प्रकारच्या वस्तु खरेदी करतात. यात्रा महोत्सवाचे मोठय़ा प्रमाणात आयोजन होत असल्याने मोठय़ा प्रमाणात उलाढाल होते.
माचणूर :
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे भीमा नदीच्या काठावर श्री सिद्धेश्वरांचे हेमाडपंथी मंदिर आहे. श्रावणमासात येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच शेकडो भाविकांच्या रांगा लागत असतात. हे ठिकाण मंगळवेढय़ापासून १४ किलोमीटर तर सोलापूरपासून ४१ किलोमीटर अंतरावर आहे. माचणूरला हरिहरांच्या मंगल मिलनाचे वरदान लाभल्यामुळे या क्षेत्राला हरिहर क्षेत्र असे म्हटले जाते. भीमेच्या कुशीत शोभणारे जटाशंकर मंदिर तसेच नदीवरील प्रशस्त घाट चढून गेल्यावर विस्तीर्ण आवारात जुन्या हेमाडपंथी बांधकामाने उठून दिसणारे भगवान सिद्धेश्वरांचे प्राचीन मंदिर, वेशीच्या दिशेने वरचा घाट चढताना उजव्या हाताला दिसणारे सुंदर मल्लिकार्जुन मंदिर ही माचणूर क्षेत्रातील महत्वाची तीन स्थाने आहेत. या सर्व स्थानांचे दर्शन घेताना परिसर न्याहाळताना इथल्या बांधकामावरून सहज नजर फिरवली असता हे तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळातील असावे असे वाटते. मंदिराच्या जवळच औरंगजेबाचा किल्ला आहे. इ.स. १६९५ ते १७00 या कालावधीत औरंगजेबाचा येथे मुक्काम होता. ब्रम्हपुरी गावात बादशहाचे सेनाधिकारी राहत होते. माचणूरच्या पूर्वेकडे भीमेच्या पलीकडे किनार्यावर बेगमपुर हे बादशहाच्या बेगमेची कबर असलेले गाव आहे.
माचणूरची यात्रा ही महाशिवरात्रीला पाच दिवसासाठी भरते, पहिल्या दिवशी माचणूर गावातून वाद्याच्या गजरात शोभेचे दारूकाम वाजतगाजत देव मंदिरामध्ये आणला जातो. तिसर्या दिवशी कुस्तीचे आयोजन केले जाते नंतर पाचव्या दिवशी देवाची पालखी परत नेण्यात येते.
श्रीक्षेत्र मातुर्लिंग :
सिद्धापूरचे ग्रामदैवत मातुर्लिंग गणपती देवस्थानच्या ट्रस्टची स्थापना १९८१ साली झाली असून त्यास १९८४ साली मान्यता मिळाली. या ट्रस्टद्वारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. मकर संक्रांतीच्या दुसर्या दिवशी या स्थानी मोठी यात्रा भरते. सकाळी सूर्याद्यापासून ते सूर्यास्तापर्यंत एक दिवसाची यात्रा भरते. यात्रेमध्ये जवळपास १ लाख भाविक भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतात. यात्रेमध्ये दर्शनास येणारे भाविक आपल्या मनोभावना देवापुढे व्यक्त करतात व श्रद्धेने नवस बोलतात. त्याचे त्यांना चांगले प्रत्यंतर येताच पुढील वर्षी पुन्हा नवस फेडण्यासाठी दर्शनास येतात. अशा प्रकारे भाविकांची पंचकवेशीत व सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर दूरच्या अंतरावरून भाविक येतात. देवस्थानचा ट्रस्टकडून प्रत्येक वर्षी ग्रामविकास, धर्म संस्कार, जनजागृती, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, गरीब विद्यार्थ्यांना मदत असे कार्यक्रम रबिण्यात येतात.
लक्ष्मीदहिवडी
लक्ष्मी देवी भाविक भक्तांमध्ये अगदी अल्पावधीतच प्रसिद्ध झाली आहे. लक्ष्मीदहिवडी येथे ४ मे ते ८ मे पर्यंत यात्रा भरत असते. लक्ष्मी देवीचे जुने प्राचीन काळातील बांधकाम असून ४७४ सालात बांधण्यात आलेला शिलालेख आहे. यात्रेनिमित्त विविध पारंपरिक व सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात्रेनिमित्त दिवाळी, दुसर्याप्रमाणे जी तयारी केली जाते अगदी तशीच तयारी या यात्रेत केली जाते. सर्व घरांची साफसफाई, रंगरंगोटी गावातील घरे रंगवली जातात. यात्रेच्या दिवशी पर गावहून आलेल्या भाविक भक्तांची व पाहुण्यांची गोड नैवेद्यांचा कार्यक्रम केला जातो. तसेच श्रीमती निर्मला विष्णु आहिरे यांनी देवस्थानच्या लगत असलेली बागायत अडीच एकर जमीन ११ लाख ५0 हजार रुपयांना खरेदी करून बाहेरील गावातून आलेल्या भाविक भक्तांची राहण्याची सोय व्हावी म्हणून त्या जागेत भक्तनिवास बांधण्यात येणार आहे.
हून्नूर :
येथील ग्रामदैवत श्री बिरोबाचे बारा अवतार व शिष्य महालिंगराया देवाचे सात अवतार आहेत. श्री बिरोबा हे नवसाला पावत असल्यामुळे दर महिन्याच्या अमावस्येदिवशी हजारो भाविक येथे हजेरी लावतात. दर अमावस्येला बिरोबाचा उत्सव होत असून वर्षातून तीन वेळा गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया व भेटसोहळा यावेळी मोठी यात्रा भरत असते. भेटीचा सोहळा सीमोल्लंघनापासून सातवे दिवशी गुरूशिष्याच्या भेटीचा सोहळा हुन्नूर येथील गावठाणमध्ये पार पडत असतो. भेट सोहळ्यानंतर गुरू बिरोबा शिष्य महालिंगराया हे मिळून श्री बिरोबा मंदिरात जातात. पुढे देवाच्या नावाने पुजारी पाऊस, रोगराई, धान्य, कडधान्य, राजकारण या सर्वाबद्दल भाकणूक सांगतात. त्यादिवशी पुरणपोळीचे जेवण देण्याची प्रथा आजतागायत चालू आहे. भक्तगणही पुरणपोळीचे नैवेद्य करतात. तिसर्या दिवशी बिरोबाला अभिषेक घालून महालिंगरायाचे हुलजंती गावाकडे प्रयाण होते. सदर भेट सोहळ्यास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आदी राज्यातून भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. सदर भेटीचे सोहळ्यामध्ये शिष्य गुरूला हुलजंती येथील भेट सोहळ्यापासून नवव्या दिवशी हुलजंती येथे भेट सोहळ्यास जातात. भेट सोहळा हा हुलजंती येथील ओढय़ामध्ये होतो. शहरी व ग्रामीण भागातील पै-पाहुण्यांची एकत्रित भेट या यात्रेच्या माध्यमातून होते.
Post a Comment