शुष्क अशा मंगळवेढ्यातील माळरानावर कधी काळी अवकळा पसरली होती. ना पाणी होतं, ना पीक. पण अंकुश पडवळे या शेतकऱ्याने तरुणांना हाताशी धरलं आणि फुलवलं नंदनवन. कृषीक्रांती फार्मर्स ग्रुप उभा राहिला आणि सुरु झाला दुष्काळाशी लढा. एकाला 20 जण सरसावले, आर्थिक बळ मिळालं, बँकाही पुढे सरसावल्या. तरुणांनी सखोल अभ्यास केला, अभ्यासाप्रमाणे पेरलं आणि जे उगवलं, त्याची ख्याती महाराष्ट्रात पसरली. प्रत्येकी फक्त एक एकर शेती, सर्वांची मिळून 17 लाखांची एकरकमी गुंतवणूक आणि पुढच्या वर्षात प्रत्येकी 20 लाखांचा फायदा, पण त्यांच्या या यशाचं गमक इथं नसलेल्या पाण्यात आहे. पाणी आलं पण पीक पद्धतीही महत्त्वाची होती. त्यासाठी बाजाराचा अभ्यास हवा, तोही केला. पहिल्याच सहा महिन्यात ढोबळ्या मिर्चीचं 60 ते 90 टन उत्पादन आलं. त्यासाठी तरुणांनी बाजारही शोधला तो थेट परराज्यात. दुसऱ्या टप्प्यात काकडी घेतली आणि दोन महिन्यात 80 ते 90 टनाचं उत्पादन. फक्त अर्धा इंच पाण्यात 10 लाखांचं उत्पन्न. कृषीक्रांती फार्मर्सची यशोगाथा महाराष्ट्रात पसरली आणि हे शेडनेट बनले प्रेरणास्रोत. या दबंग ग्रुपचे मनसुबेही दबंग आहेत. आगामी काळात त्यांना 150 मेंबर करून 150 शेडनेटची शेती फुलवायची आहे. शेडनेटचा दुहेरी उपयोग असल्याने गारपिटीने नुकसान होत नाही आणि पाणीही कमी लागतं. दुष्काळ, गारपीट आणि सरकारी अनास्थेच्या नावाने बोटं मोडत अनेक जण मृत्यूला कवटाळतात. पण मंगळवेढ्याच्या या ध्येयवेड्यांनी महाराष्ट्रासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment