हल्ल्यात दोघे गंभीर परिसरात सर्वत्र तणाव रुग्णालयातही गर्दी
सोलापूर / प्रतिनिधी
सात रस्ता परिसरातील संगमेश्वर महाविद्यालयाच्या कॉर्नरवर असलेल्या एका कॅन्टीन वजा गाड्यांवर वाहनांवरुन शस्त्रानिशी आलेल्या १५ ते २0 जणांच्या जमावाने तोडफोड करुन दोघा तरुणांवर प्राणघातक हल्ला चढविला. शस्त्रधारी टोळीने केलेल्या हल्ल्यात ते दोघे तरुण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मात्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३0 वाजण्याच्या सुमारास घडली.बाबा यल्लय्या केशपागा (वय २७, रा. दक्षिण सदर बझार, सात रस्ता, सोलापूर) आणि मनोज भीमय्या चलवादी (वय २४, रा. थोरली ईरण्णा वस्ती, सोलापूर) अशी जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. घटनेनंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जमावाने केलेल्या हल्ल्याच्या प्रकारामुळे सात रस्ता परिसरातील संगमेश्वर महाविद्यालयालगत चालणारे विविध खाद्य पदार्थांच्या गाड्यांनी तेथून धूम ठोकली. या घटनेची खबर मिळताच जखमींच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केल्याने तेथीलही बंदोबस्त वाढविण्यात आला. संगमेश्वर महाविद्यालयाच्या कॉर्नरला मनोज चलवादी याचा चहा कॅन्टीन वजा खाद्य पदार्थाचा गाडा आहे. या कॅन्टीवर मनोज आणि बाबा याच्यासह त्याचे अन्य मित्र बसले होते. रात्री ९ च्या सुमारास वाहनांवरुन सलगर वस्ती परिसरातील काही तरुण तेथे आले. त्यांनी या गाडीवर अज्ञात कारणावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. हे प्रकरण लांबल्याने पुन्हा सेटलमेंट, रामवाडी परिसरातील प्रेम गायकवाड व त्याच्या इतर १५ ते २0 साथीदारांनी तेथे येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जखमींच्या म्हणण्यानुसार या टोळींच्या हातात शस्त्रे, हॉकी स्टीक, काठय़ा होत्या. वाहनांवरुन या आलेल्या जमावाने अज्ञात कारणावरुन अचानकच तोडफोड करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शस्त्रांनी व हॉकी स्टीकने केलेल्या मारहाणीत बाबा केशपागा हा गंभीर जखमी झाला. तर मनोज चलवादी यालाही मारहाण झाल्याने तो जखमी झाला. या घटनेनंतर तेथे पळापळ झाली. जखमी अवस्थेत दोघांनाही मित्र बाबा चिन्नापागू याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. जमावाने त्या कॅन्टिनमधील पैसेही लुटल्याची तक्रार जखमींनी केली आहे. ही खबर त्यांच्या मित्रांपर्यंत पोहोचताच त्यांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेऊन गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच सदर बझार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौगुले आणि त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व चोख बंदोबस्त तैनात केला. रात्री उशिरापर्यंत सदर बझार पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात जखमींचे जबाब व फिर्याद घेण्याचे काम सुरु होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment