0

सांगोला / तालुका प्रतिनिधी
मित्रानेच मित्राचा विश्‍वासघात करीत घरात कपाटात ठेवलेले सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सांगोला शहरातील गणेश नगरमध्ये घडली आहे. प्रविण चंद्रकांत मेखले (२५, रा.चोपडी, ता.सांगोला) असे आरोपी मित्राचे नाव आहे. अमोल नवनाथ पवार याचे मिरज रोडवरील गणेश नगरमध्ये घर असून प्रविण मेखले हा मित्र त्याच्या घरी भाडेकरू म्हणून निवासी राहत होता. दरम्यान अमोल पवार व प्रविण मेखले यांच्यात घनिष्ठ मैत्री झाल्याने कौटुंबिक संबंध वाढत गेले. घटनेदिवशी अमोल पवार याच्या नातेवाईकाचे लग्नकार्य असल्याने त्याने कपाट उघडले असता कपाटातील चेन व ब्रासलेट सापडले नाही. कपाटातील दागिन्यांविषयी त्याने घरातील लोकांकडे चौकशी केली असता माहीत नसल्याचे सांगण्यात आले. तर प्रविण मेखले हा गेल्या दोन-तीन दिवसापासून गायब असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. दरम्यान अमोल पवार याने प्रविण मेखले यास तू कपाटातील दागिने घेवून गेला आहेस का अशी विचारणा केली असता त्याने हो घेवून गेलो आहे, असे सांगितले. अमोल पवार याने दागिने परत देण्याबाबत वारंवार मागणी केली असता प्रविण मेखले टाळाटाळ करू लागल्याने अखेर अमोल नवनाथ पवार याने शुक्रवारी रात्री उशिरा प्रविण मेखले याच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास हवालदार एस.डी. राऊत हे करीत आहेत.

Post a Comment

 
Top