सोलापूर / सचिन गाडेकर
माझ्या शेतकर्यांची बांधावरील भांडणे बांधावरच मिटावीत, गावातील मतभेद मिटविण्याच्या हेतूने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची बीजारोहण करणारे आर. आर. आबा आज या जगातून निघून गेले आहेत. त्यांनी लावलेल्या या तंटामुक्तीचा वृक्ष दिवसेंदिवस बहरत जावो. हीच अपेक्षा राज्यातील तमाम ग्रामीण जनतेची आहे. शब्दाला शब्द वाढतच जातो. आणि त्याचे रुपांतर मोठय़ा भांडणात होते. गावातील भांडण पोलीसांपर्यंत जाते. आणि त्याच कोर्टकचेरीच्या कामात माझ्या मायबापांचे आयुष्य झिजते. त्यामुळे गावातील तंटे गावातच मिटावीत याच उदात्त हेतून तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी १५ ऑगस्ट २00७ रोजी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची मुहरूतमेढ रोवली. अवघ्या सात वर्षाच्या काळात या मोहिमेमुळे राज्याची वाटचाल शांततेतून समृध्दीकडे होताना दिसून येत आहे. परिणामी विकासकामांनाही गती मिळाली आहे. याचे सारे श्रेय केवळ अन केवळ आबांनाच जाते. ही मोहीम केवळ नावापुरतेच राहु नये. आणि या मोहीमेबाबत नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण होण्यासाठी रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन तंटामुक्त गावांना पुरस्काराने गौरविण्याचा निर्णयही आबांनी घेतला. तसेच या मोहीमेच्या प्रसार व प्रचारासाठी माध्यमांमध्ये काम करणार्या पत्रकारांनीही पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. परिणामी तंटामुक्त मोहिमेला राज्यात दिवसेंदिवस बळकटीच येत चालली आहे. या मोहीमेमुळेच आज पोलिसांतील गुन्ह्यांमध्ये मोठय़ाप्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात वर्षापासून या मोहिमेला भरभराटीच येताना दिसून येत आहे. नुकतेच राज्यातील सरकार बदलले आहे. घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. या म्हणीप्रमाणे 'आघाडी' सरकारने घेतलेले अनेक निर्णय भाजप सरकार रद्द करीत आहे. मात्र आबांनी सुरु केलेली तंटामुक्त मोहीम 'महायुती' सरकारने अखंडपणे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्र मात तंटामुक्त मोहीम एक चांगली योजना असल्याचे सांगताना या योजनेला बळकटी देण्याची घोषणा करताना ही योजना अखंड व प्रभावीपणे राबविणार असल्याचे सांगितले. यापुढे गावागावातील तंटे गावातच अन बांधावरील तंटे बांधवरच मिटली तरच खर्या अर्थाने आबांना श्रध्दांजली ठरणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment