एक सच्चा कम्युनिस्ट नेता, गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज, एक चिकित्सक विचारवंत कॉ. गोविंद पानसरेंवर मागील सोमवारी हल्लेखोरांनी गोळय़ा झाडल्या. त्यांच्या गोळय़ांनासुद्धा या लढवय्याने लगेच भीक घातली नाही. लढत राहिला एक आठवडा पण शरीर आणि प्रतिकार करणार्या शारीरिक र्मयादा वयोमानामुळे आड आल्या आणि या लढवय्याने शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. कम्युनिस्ट कधी रडत नाही मात्र या कॉम्रेडने रडवले. कारण चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरणारा कॉम्रेडच आज चेतनाहीन झाला होता. खरं तर मृत्यू हा कोणाचाही असला तरी संवेदनशील मनासाठी तो त्रासदायकच. परंतु नैसर्गिक मृत्यू आणि काही कारणासाठी हत्या होऊन आलेला मृत्यू यामध्ये खूप फरक आहे. त्यातल्या त्यात एखाद्याचा विचार दाबण्यासाठी केलेली हत्या ही एका अर्थाने त्या विचारांचा विजयच असतो हे लक्षात येते. सॉक्रेटिसपासून गांधींपर्यंत आणि नरेंद्र दाभोलकरांपासून ते कॉ. गोविंद पानसरेंपर्यंत सर्वांच्या हत्या या त्या विचाराला झळाळीच देणार्या ठरल्या. खरेतर कोणताही विचारवंत मग तो पुरोगामी असो किंवा प्रतिगामी हा कुणा एका व्यक्तीचा विरोधक कधीच नसतो किंवा त्याच्या विचाराने संबंध सृष्टीचे वर्तन बदलेल असेही नसते. तो केवळ एखाद्या मुद्यावर स्वत:चे मत व्यक्त करत असतो. त्याचे मत व्यक्त होण्यापूर्वी समाजात काही मतप्रवाह अस्तित्वात असतात. त्याचे मत म्हणजे एक नवीन मतप्रवाह नसतो तर केवळ एक प्रतिक्रिया असते. मानवजातीच्या निर्मितीपासून समाजाच्या विविध टप्प्यामध्ये अनेक प्रकारचे विचारप्रवाह चालत आले आहेत. जे चांगले वाटतील ते समाजाने स्वीकारलेसुद्धा. पानसरेंचा काय किंवा दाभोळकरांचा काय एक वेगळा विचार होता. तो समाजाने काहीही करून स्वीकारावा असा आग्रह त्यांचा कधीच नव्हता किंवा आमचा विचार तुम्ही स्वीकारा म्हणून त्यांनी कधी कुणाला धमकावल्याचेही ऐकिवात नाही. आपला विचार मांडण्यासाठी त्यांनी प्रबोधनाचा, अहिंसेचाच मार्ग पत्करला. त्यांनाच हिंसक मृत्यूला सामोरे जावे लागणे हे मात्र खचितच न्यायी आत्म्याला अनुसरून नाही. प्रबोधनाचा किंवा विवेकाचा विचार मांडणार्यांच्या हत्या होणे ही काही नवीन बाब नाही. सॉक्रेटिसलासुद्धा या प्रबोधनाच्या गुन्हय़ामुळेच विषाचा प्याला घ्यावा लागला होता. संत ज्ञानेश्वरांच्या माता-पित्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले, सावित्रीबाईला शेण, दगडगोटे खावे लागले तर भगतसिंगाला फासावर जावे लागले. सामान्य माणसांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणार्या गांधींनासुद्धा गोळीच झेलावी लागली तर शिक्षणाचा विचार मांडणार्या मलाला युसूफजाईलासुद्धा गोळय़ा झेलाव्या लागल्या तर अंधश्रद्धा दूर करण्याचा उपदेश करणार्या दाभोलकरांनासुद्धा गोळीच खावी लागली. म्हणजे प्रबोधनाचा, सुधारणांचा आणि बलिदानाचा खूप जवळचा संबंध आहे. बलिदानाच्या या यादीत आता गोविंद पानसरेंची भर पडलीय. पानसरे तर कम्युनिस्ट. कम्युनिस्टांचा आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहासच आहे. जगाच्या कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास तपासला आणि भारतीय कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास तपासला तरी आपल्याला तो बलिदानाने भरलेलाच दिसेल. या बलिदानांनी कम्युनिस्ट चळवळी अधिक वाढतल्याचेच दिसेल. सॉक्रेटिसला मारले म्हणून त्यांचा विचार संपला नाही तर प्लेटो, अँरिस्टॉटल सारख्यांनी तो प्रवाहित केला. भगतसिंगाला फाशी दिल्याने भगतसिंग संपले पण क्रांतिकारी विचार जन्माला घालून गेले. गांधींना मारले पण गांधीवाद जगाला प्रभावीत करून गेला. दाभोलकरांना मारले पण विवेकाचा जागर सुरू झाला तसेच गोविंद पानसरेंच्या बलिदानाबाबत न घडल्यासच नवल. 'आम्ही सारे पानसरे'च्या रूपाने पुन्हा पानसरे प्रवाहित होतील. दाभोलकर काय किंवा पानसरे काय यांच्या हत्येने एका बाजूला मात्र पराजयाची भावना दाटून येतेय. तो पराजय या चळवळीचा नव्हे तर तो पराजय या पुरोगामी महाराष्ट्राचा. ज्या महाराष्ट्राने संपूर्ण देशाला पुरोगामीत्वाची आणि प्रबोधनाची देणगी दिली त्याच महाराष्ट्रात हे घडावे. पानसरेंची हत्या तर खुद्द शाहू महाराजांच्या जन्मभूमीत व्हावी हे मात्र अस्वस्थ करणारे आहे. अशा हत्या करून चळवळी संपतील असे नाही उलट त्या अधिक तेजस्वी होतील; परंतु अशा हत्यांमुळे मात्र ज्ञानदानाच्या क्षेत्रात अस्वस्थता पसरल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञान माणसाला चिकित्सा करायला शिकवते असे म्हणतात, पण चिकित्सा करण्यासाठी प्राण द्यावे लागतात हे आम्ही कसे शिकवणार! स्वातंत्र्याचा धडा शिकविताना 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आम्ही कोणत्या तोंडाने शिकविणार! अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व देणारे विचार हे नेहमीच सर्वांच्या अभिव्यक्तीचा आदर करतात. पानसरेंच्या अभिव्यक्तीचाही असाच आदर व्हायला हवा होता; परंतु तसे दुर्दैवाने झाले नाही. -
डॉ. संग्राम मोरे,
लातूर संपर्क- ८४१२0९४000 (पुण्यनगरी )
Post a Comment