म्हैसगाव (ता. माढा) येथील विठ्ठल शुगर कार्पोरेशन कारखान्यात ट्रॅक्टरमधून एकाचवेळी ४७ मेट्रिक टन ऊस वाहतूक करुन सोलापूर जिल्ह्यात एकाच खेपेतील ऊस वाहतुकीचा उच्चांक स्थापन केला आहे.
संजय शिंदे संस्थापक अध्यक्ष असलेल्या 'विठ्ठल शुगर' साखर कारखान्यामध्ये आनंद टोणपे हे आपल्या 'महेंद्रा- अर्जुन मोठय़ा ट्रॅक्टरमधून नियमित ऊस वाहतूक करत आहेत. बुधवार, दि. १८ रोजी टोणपे यांनी अकोले खुर्द येथील नानासो नवले या शेतकर्याच्या शेतात तोडलेल्या उसाची ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्यामध्ये, तोडणी मजुराकडून व्यवस्थित भरणी केली आणि सागर रजपूत या ड्रायव्हरने ट्रॅक्टर चालू करुन कारखान्याकडे जाण्यास प्रारंभ केला. अकोले खुर्द ते म्हैसगाव कारखाना हे अंतर ५0 किमी आहे. तसेच काही ठिकाणी चढउतार तर रस्त्यांनी इतर वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर चालू असते. रात्री ११ च्या दरम्यान उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉल्यासहित ट्रॅक्टर कारखान्यात पोहोचला. रस्त्यांनी शेकडो नागरिक आपली वाहने थांबवून व बाजूला उभे करुन भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्याकडे पाहातच होती. नंतर कारखान्यात दोन्ही ट्रॉल्यांचे स्वतंत्रपणे वजन करण्यात आले. एकूण हे ४६ टन ८६९ किलो वजन भरले व उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
संजय शिंदे यांना हे वृत्त समजताच त्यांनी आनंद टोपणे तसेच ड्रॉयव्हर सागर रजपूत यांचे अभिनंदन केले. संजय शिंदे म्हणाले की, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, गुरसाळे (पंढरपूर) येथे काही वर्षापूर्वी ट्रॅक्टरने एकाच खेपेत ४५ टन उसाची वाहतूक करुन जिल्ह्यात उच्चांक स्थापन केला होता. आनंद टोणपे यांनी ४७ टन ऊस वाहतूक करुन जिल्ह्यातील पूर्वीचा उच्चांक मोडला आहे. टेंभुर्णी येथील 'श्रीकृष्ण ट्रेलर'च्या कामगारांनी आनंद टोणपे यांच्या 'अर्जुन ट्रॅक्टर'ला ऊस वाहतुकीदरम्यान मोलाचे सहकार्य केले.
ऊस वाहतुकीच्या उच्चांकाबद्दल विठ्ठल शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर एच.बी. डांगे, मुख्य शेतकी अधिकारी भारत रोकडे, शेती अधिकारी अंबऋषी कदम व इतर विभाग प्रमुखांसहित अनेक वाहनमालक, बागायतदार शेतकरी व नागरिकांनी आनंद टोणपे यांचे अभिनंदन केले.👇🌾🌾🌾
Post a Comment