कॅनडास्थित अनिवासी भारतीयाची "फेसबुक‘वर पोस्ट; कल्याण येथे गुन्हा दाखल
राळेगणसिद्धी -
‘आधुनिक गांधी असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा खून करून मी दुसरा नथुराम गोडसे होणार आहे,‘ अशी धमकी कॅनडात राहणाऱ्या गगन विधू याने "फेसबुक‘च्या माध्यमातून दिली. दिल्लीतील आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हजारे यांनी येऊ दिल्याबद्दल त्याने राग व्यक्त केला आहे.
विधूचे ‘फेसबुक फ्रेंड‘ अशोक गौतम (रा. कल्याण) यांनी याबाबत कल्याण येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या येथील कार्यालयानेही पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून हजारे यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते म्हणून काही काळ येथे काम करून अशोक गौतम पुन्हा कल्याणला परतले. त्यांचा कॅनडातील गगन विधू याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क आला व दोघांमध्ये संवाद सुरू होता. दरम्यान, भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी हजारे यांनी 24 फेब्रुवारीला दिल्लीत "जंतरमतर‘समोर आंदोलन केले. त्याचदिवशी गगन विधूने "फेसबुक‘वर पोस्ट टाकली. "टाईम हॅज कम टू किल अण्णा हजारे. आय विल बी नेक्स्ट नथुराम गोडसे.‘ असे त्यात म्हटले होते. या पोस्टला सुरेश अंगुरल, जसप्रीतसिंग श्रान, राजताब बेक्टर यांनी लाईकही केले.
अशोक गौतम यांनी विधूला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. विधूने मात्र 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा पोस्ट टाकून हजारे यांच्या हत्येचा पुनरुच्चार केल्याने अशोक गौतम यांनी कल्याण येथील गोदरेज हिल खडकपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
मरणाची भीती नाही - हजारे
या धमकीबाबत अण्णा हजारे म्हणाले, की यापूर्वीही मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या आल्या. त्यांना मी भीक घालत नाही. मला मरणाची भीती नाही. मी माझे काम थांबविणार नाही. सुरक्षेबाबत विचारल्यावर ते म्हणाले, की सुरक्षा काय करील, माझे मरण थांबवू शकते का, असे काम करताना अशा गोष्टी सहन कराव्याच लागतात
Post a Comment