0

पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यालाही अश्रु अनावर

बार्शी -: महाराष्ट्र राज्य शासनाने शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानीत केलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रिंबक आप्पाराव फंड यांनी तंत्रशुध्द पध्दतीने जोपासलेली बागही अवकाळी पावसाच्या व गारपीटीच्या तडाख्याने संकटात सापडली आहे. आजपर्यंत शास्त्र आणि कष्टाच्या जोपासनेमुळे चेहर्‍यावर सतत हास्य असलेल्या विकसनशील व द्राक्ष निर्यातदार शेतकर्‍याला अश्रु अनावर होत आहेत.
बार्शी तालुक्यातील वैराग भागात तीन दिवस पावसाने नुकसान केल्यानंतर बार्शी शहर व परिसरातही पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, गारपीठीसह अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान रानावनात राहणार्‍या अनेक गरीब कुटूंबाच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांच्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.
तालुक्यात अनेक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे परंतु शासनाचे प्रतिनिधी व कर्मचारी यांनी पंचनामे करुन शेतकरी व नागरिकांच्या नुकसानीच्या नोंदी घेण्याऐवजी व्यक्तीगत कामांवर भर दिला आहे. नैसर्गीक आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकण्यासाठी कोणताही राजकिय पुढारी आला नसल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Post a Comment

 
Top