0

शासनाचा लाखो रूपयाचा खर्च पाण्यात

शासनाने जनतेच्या हितासाठी मंगळवेढा तालुक्यात बसविण्यात आलेल्या सौर दिव्यांना भंगाराचे स्वरूप आले असून या दिव्यांच्या बॅटर्‍या चोरीला गेल्या आहेत व देखभालीअभावी शासनाचे लाखो रूपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवेढा तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत दिवे प्रदान केले आहेत. दलितवस्ती, स्मशानभूमी, शाळा तसेच सार्वजनिक चौक इत्यादी ठिकाणी हे दिवे लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने ही योजना अंमलात आणल्याने सुरूवातीच्या काळामध्ये प्रत्येक गावागावात सार्वजनिक ठिकाणी या सौर दिव्यांच्या माध्यमातून प्रकाश पडला होता. परंतु, आता त्या सौर दिव्यांच्या संचातील बॅटरी देखभालअभावी गेली कित्येक महिन्यापासून बंद पडले. बॅटरी चोरीचे सत्र सुरू झाले आहे. स्थानिक ग्रामपंचायतींचे या दिव्यांकडे दुर्लक्ष झाल्याने या महत्वपूर्ण योजनेला कचर्‍याचे स्वरूप आले असल्याचे नागरिकांतून मत व्यक्त केले जात आहे. सौर ऊज्रेवर चालणार्‍या दिव्यामुळे ग्रामीण भागात रात्री चांगली सोय झाली होती. परंतु, स्थानिक प्रशासनाचा वेळकाढू धोरणामुळे हे गावातील दिवे केवळ खांबावरच उभे असलेले पहायला मिळत आहेत. शासनाच्या अशा योजनेसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा असतो. मात्र, समाजातील नागरिकांकडून अनेक वेळा दुर्लक्ष करत बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात सौर उज्रेवर चालणारे दिवे ग्रामपंचायतींना देण्यात आले. प्रशासन गावच्या विकासासाठी अनेक योजना राबवते. काही योजनेचा लाभ गावकर्‍यांना मिळतो मात्र, काही योजना गावाच्या हिताच्या असल्या तरी त्या योजनेची पुरेपूर अंमलबजावणी कर्मचार्‍यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकूणच मंगळवेढा तालुक्यात सौर दिव्यांना भंगाराचे स्वरूप आले असून शासनाचे लाखो रूपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

 
Top