0

सध्या अनियंत्रित असलेले तापमान, अवेळी पडणारा पाऊस, हे वातावरण पारंपरिक (खुल्या) पद्धतीच्या शेतीमध्ये घातक ठरत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्य़ासह राज्यातील शेतकरी हरितगृह (ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस) शेतीकडे वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हरितगृहात ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले तर भरघोस उत्पादन निघेल. ग्रीनहाऊसमध्ये फूल शेतीबरोबरच भाजीपाला शेतीही करता येते. त्यात प्रामुख्याने काकडी, टोमॅटो, ढोबळी मिरची ही भाजीपाला पिके घेता येतील. विशेषत: हरितगृहातील भाजीपाला उत्पादन पाण्याची उपलब्धता असेल तर वर्षभर केव्हाही घेता येते. ढोबळी मिरची लागवड हरितगृहात ढोबळी मिरचीची लागवड करीत असताना रोपवाटिकेतील चांगल्या निरोगी, दज्रेदार रोपांची निवड करावी. अधिक उत्पादन देणारा वाण लागवडीसाठी निवडावा. एक चौरस मीटर परिसरात सहा रोपे लावावीत. रोप लागवडीनंतर हरितगृहातील तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नियंत्रित ठेवावे. उन्हाळ्य़ात ढोबळी मिरचीची लागवड करीत असताना हरितगृहात काळ्य़ा पॉलिथीन पेपरचे आच्छादन करावे. या पिकाला ७0 ते ८0 टक्के आद्र्रतेची आवश्यकता असते. खत व्यवस्थापन : ढोबळी मिरचीची लागवड केल्यानंतर हंगाम, मातीची प्रत व वाढीची अवस्था लक्षात घेऊन खत व्यवस्थापन करावे. द्रवरुप खते देताना नत्र ३३0 पीपीएम, कॅल्शियम ७५ पीपीएम, सल्फेट ४0 पीपीएम याप्रमाणे द्यावे. ढोबळी मिरचीच्या झाडाला सुरुवातीला एकच खोड असते. ९-१0 पाने आल्यानंतर ३-४ फांद्या येतात. मुख्य झाडाच्या दोन-तीन फांद्या ठेवून बाकीच्या फांद्या कापून टाकाव्यात. झाडांना आधार देण्यासाठी वरच्या दिशेला आडव्या बांधलेल्या तारांचा झाडांना आधार द्यावा. अशापद्धतीने हरितगृहात ढोबळी मिरचीची लागवड केली असता भरघोस उत्पन्न मिळेल. -

(पुण्यनगरी )


              प्रा. महादेव चिंचोले, ९९६0७0९५५६

Post a Comment

 
Top