बसवेश्वर बेडगे/सोलापूर
जेथे वित्तीय संस्थेचे जाळे समाजात खोलवर रुजते तेथे आर्थिक, सामाजिक विकास होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सव वर्षारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी लातूर येथील विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन ॲअॅण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक सदस्य डॉ. अशोकराव कुकडे होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, बँकेचे चेअरमन जगदीश तुळजापूरकर, सुवर्ण महोत्सवी वर्ष समितीचे अध्यक्ष किशोर देशपांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन-धन योजनेद्वारे 13 कोटी परिवार वित्तीय संस्थेत आणले. बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये समाविष्ट होवून व्यवसायासाठी तरुणांच्या पाठीमागे उभे राहावे. जेव्हा सहकारी बँक चांगली संस्कारित माणसे चालवितात, तेव्हा नुसती बँक मोठी होत नाही तर समाजसुध्दा मोठा होतो.
ज्या बँका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात, ज्यांची विश्वासार्हता आहे त्याच बँका पुढे जावू शकतात. बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांना घरबसल्या व्यवहार करता आला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 50 वर्षांच्या वाटचालीत या बँकेने आव्हानाचा सामना करतानाच भविष्याचे पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवून आत्मविश्वासाने पुढे जात आहे. सहकारी बॅंकेच्या विविध समस्या पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्री यांच्यासमोर मांडून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या बँकेने विविध राज्यात जावून आपल्या शाखा काढून विश्वासार्हता निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. कुकडे म्हणाले, या बँकेने व्यवहारातून समाजात विश्वास दृढ केला, त्याआधारे प्रगती केली. एका व्यक्तीसाठी, विशिष्ट गटांसाठी, समुहासाठी ही बँक चालविली नाही तर समाजातील गरजू छोट्या व्यक्तींना मोठे करण्याचे काम या बँकेने केले. या बँकेची ध्येयवादी वृत्ती, उत्तम परंपरा संचालक मंडळाने यापुढेही चालू ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जगदीश तुळजापूरकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. यावेळी किशोर देशपांडे यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमात बँकेच्या सुवर्ण लक्ष्मी ठेव योजना व सुवर्ण उद्यम कर्ज योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
-----------------------------------------
Post a Comment