तहसीलचा संबंध नाही
तहसिल कार्यालयात कार्यरत असलेला एक कारकुन व एक शिपाई या दोघा कर्मचार्यांत खुद्द तहसिलदार पुनाजी कोथेरे यांच्या समोर फिल्मी स्टाईल पध्दतीने हाणामारीची घटना घडली. या घटनेमुळे तहसिलदारांचे कर्मचार्यांवर नियंत्रण नसल्याचे सिध्द झाले आहे. दरम्यान, या हाणामारीची घटना तालुकाभर चविष्ठरित्या सर्वत्र चर्चिली जात आहे. तहसिल कार्यालयात मंगळवार दि. १४ रोजी सकाळी १0 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी कर्मचारी आले होते. अज्ञात कारणासाठी कारकून व शिपाई यांचा वाद विकोपाला गेला. अन् दोघात हमरी-तुमरी होऊन फिल्मी स्टाईलने हाणामारी सुरू झाली. यावेळी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित असल्यामुळे ही घटना वार्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. त्यामुळे महसुल खात्याच्या अब्रुची लख्तरे वेशीवर टांगली गेली. खुद्द हा प्रकार तहसिलदार पुनाजी कोथेरे यांच्यासमोर घडला असताना या घटनेला ४८ तास उलटून गेले असून अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनावर तहसिलदार यांचा वचक नसल्याचे या भांडणावरून नागरिकांच्या दिनर्शनास आले. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे कामातून प्रशासनाला शिस्त लावीत असताना मंगळवेढा येथे मात्र महसुल खात्याचे दोन कर्मचारी अधिकार्यांसमोर हाणामारी केल्यामुळे जिल्हाधिकारी मुंढे हे यावर कोणती कारवाई करणार? याकडे मंगळवेढा तालुक्यातील तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. महसुल खात्यातील हाणामारीची घटना ही मंगळवेढय़ाच्या इतिहासातील पहिली घटना असल्याने याबाबत नागरिकांत चर्चा होत आहे.
दोन कर्मचार्यांतील भांडणाचा घडलेला प्रकार हा तहसिल कार्यालयाच्या बाहेर घडला असून तो त्यांच्या वैयक्तिक वादातून घडला आहे. या घटनेशी तहसिल कार्यालयाचा कुठलाही संबंध नाही. - पुनाजी कोथेरे, तहसीलदार, मंगळवेढा.
Post a Comment