मंगळवेढय़ाचा वैभवशाली इतिहास जिवंत ठेवण्यासाठी श्री संत दामाजी पंतांच्या यात्रेची सुरुवात केली असल्याचे संतभूमी विकास समितीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले. महाराष्ट्रामध्ये मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. श्री संत दामाजीपंत, चोखामेळा, कान्होपात्रा, महात्मा बसवेश्वर अशा अनेक थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. या थोर संतांनी सामाजिक परिवर्तन करुन समाजामध्ये बदल घडवून आणला. या थोर संतांची नावे जरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचली असली तरी मंगळवेढय़ात मात्र त्यांच्या पुण्यतिथीसारख्या उत्सवाबाबत उदासीनता होती. अशा थोर संतांचा उत्सव सुरु करुन मंगळवेढय़ाचा इतिहास जिवंत राहील. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची आषाढी यात्रा मोठय़ा प्रमाणात भरते. तेव्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक मंगळवेढय़ात येतात. तेव्हा दामाजी पंतांची यात्रा कधी असते, अशी विचारणाही होते. ज्याप्रमाणे पंढरीचा विठ्ठल असो, आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली, देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज, पैठण येथील एकनाथ महाराज, सासवड येथील संत सोपानकाका अशा थोर संतांच्या यात्रा भरतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्रात होतो. त्याचप्रमाणे मंगळवेढय़ातील वैभवशाली परंपरा महाराष्ट्रभर पोहोचावी व इतिहास जिवंत राहावा यासाठी अनेक युवकांना एकत्रित करुन संतभूमी विकास समितीची स्थापना केली. आज तीन वर्षे झाली ही समिती काम करीत आहे. या समितीच्या माध्यमातून पुढेही असेच ठेवणार असल्याचे आवताडे यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment