0

मंगळवेढा / प्रतिनिधी
मनसेचे शहराध्यक्ष दत्ता भोसले यांची कार अडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली असून कारची मोडतोड व त्यांच्या कुटुंबियांनादेखील मारहाण करून हल्लेखोर पसार झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा शहर मनसेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे दत्ता विठ्ठल भोसले (वय ३५) हे सोमवार दि. २५ रोजी दुपारी ३.३0 वाजता त्यांच्या झायलो (एम.एच.१३/ए.झेड़ ७0१२) या कारने मंगळवेढय़ाहून सोलापूरकडे आई व पत्नी यांना घेऊन निघाले असता ब्रम्हपुरी गावचे शिवारातील शिरसट वस्तीसमोरील रोडवर अज्ञात आठ जणांनी बेकायदा जमाव जमा करून पाठलाग करत त्यांच्या कारच्या आडवी मोटार सायकल लावली व मार्केट कमिटीची माहिती मागवतो काय? तसेच वाळूचे टेंडर बंद पाडतो काय? असे म्हणून कारच्या काचेची मोडतोड केली. तसेच दत्ता भोसले यांना काठी, दगड, लोखंडी पंचने डोक्यात, हातावर, पायावर मारून तसेच उजवा हात फ्रॅक्चर करून जखमी केले. तसेच दमदाटी, शिवीगाळी करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सोडवासोडव करण्यासाठी आलेल्या भोसले यांच्या आई व पत्नी यांनादेखील काठीने मारून जखमी केले. या प्रकारानंतर भोसले व त्यांच्या कुटुंबियावर सुरुवातीस मंगळवेढय़ातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तेथे उपचार करून रात्रौ उशीरा त्यांना घरी आणण्यात आले. या घटनेची फिर्याद दत्ता भोसले यांनी दिल्याने पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम १४३,१४७, १४८, १४९, ३२४, ३२५, ३४८, ४२७, ५0४, ५0६, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब जाधव हे करीत आहेत.

Post a Comment

 
Top