0

सन्मानीय
प्रधानमंत्री, भारत सरकार
मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार
सर्व मंत्री, खासदार, आमदार
आणि
शासकीय नोकरशहा

आपणास काळजापासून साष्टांग दंडवत...

सकाळचा नाश्ता झाला असेलच
त्याला मी उत्पादित केलेले आहे....

दुपारचे जेवण करालच,
ते अन्न पिकवण्याचे काम मी केलेय...

रात्रीची भाजी नसेल कदाचित माझ्या शेतातली

तरीही रस्याबरोबर खाण्याची भाकरी, चपाती....
हो ती ज्वारी माझ्या घामाने आलीय....

पिकवतोय कोण ?
शिजवतोय कोण ?

उपाशी मरतोय मी आणि माझं कुटुंब
अन् तुपाशी खाता तुम्ही...

माझं दुःख हे नाही की तुम्ही काय खाता-पीता

माझं दुःख हे आहे की आमचं सुख तुम्ही खाता

खरं तर अडचणी कोणाला येत नाहीत
पण अडचणी सोडविण्यासाठी कोणीतरी पुढं यावं...

‘‘मरणार्‍याच्या कुटुंबाला लाखाची बक्षीसी चालु केलीत
आणि तिथच शेतकर्‍याला मरणाची दारं खुली केलीत’’

साहेब गरीबी बघतो, भोगतो, सोसतो तरी कधी
आई-बाप आमचे वृद्धाश्रमात नाहीत भेटणार...

काळा पैसा, काळा पैसा रोजच करता
कधीतरी काळी आई, काळी आई करा की...

तुमची लेकरं मोठ्या फीसच्या शाळेत जातात...

आमची लेकरं शाळा सोडून शेण काढायला जातात....

तुमच्या मुलाची फॅशन सुद्धा कशी ?

पॅन्ट फाडतेय गुडघ्यावर अजुन कुठं कुठं

का करता अशी गरीबीची चेष्टा...
मुल माझं ढुंगणावर ठिगळं घेऊन करतोय कष्ट...

रोशनाईला तुमच्या लोडशेडींग नाही पण

इथं पिकालाही अन आम्हाला जगायला लाईट नाही..

साहेब असं तडफडून मारण्यापेक्षा गोळ्या का नाही घालत..

म्हणजे पुन्हा ऐकू नाही येणार टाहो त्या मातेचा

किंकाळ्या त्या विधवा पत्नीच्या

अन् मुसमुसुणारी माझी लेकरं

एक नव्हे हजारो मेले पण कधी पाझर फुटणारहो तुम्हाला...

पारतंत्र्यातही कष्टाला भाकर मिळत होती...

मग स्वातंत्र्य कोणाच्या भल्याचे झाले...?

कसली लोकशाही .... ?

तिची व्याख्या‘या पुस्तकातच वाचायला बरी वाटतेय आता...

माफ करा पण आता

प्रसारमाध्यमात ठळक बातमीत
शेतकरी झळकतोय....मग

आत्महत्येत का असेना...

कुठे चुकले हो...
हे गणित का बिघडलेय

वाटले होते शिक्षणाने डोकं सुपिक होतय

पण शिकलेली डोकी सुपिकाला नापिक करतेय

कॉम्प्युटर पिकविल का दोन पोतं धान...

लावील का फळांची चार झाडं...
तंत्रज्ञानाचा फायदा मग आम्हाला का नसावा...

मोबाईल आम्ही नव्हता मागीतला देऊ केला तुम्हीच

कृषी कार्ड म्हणून प्लॅन करुन आमच्या गळ्यात अडकवता

अन वर मोबाईल बिल भरता म्हणूनही ओरडताय

असते इलेक्शन म्हणून, जोडता कनेक्शन

अन् निवडूण गेलात की पुन्हा तोडता कनेक्शन....

इथं माणूसकीच लुटली गेलीय मग

कशाला पिटताय डंका उगाच देशोदेशी...

साहेब उगाच मनाला नका लावून घेऊ....

शेवटी जाताना उगीच मन हलके केले फक्त

तसाही फासाच्या दोरीनेही नाही दिला दगा कधी ....

माफ करा....
(स्वारी म्हणावं लागेल नाही का ?)

वाचावयाचा असेल शेतकरी तर काहीं गोष्टी कराच !

पहिली एक लाखाची बक्षीसी बंद करा....

शेती बांधावरुन दिसते साहेब, कार्यालयात कागदावर बघून नाही

संडासाची काळजी करता पण पाण्याची नाही

करा प्रत्येकाच्या शेतात एक शेततळं त्याला कशाला जात पाहिजे

शेतकरी ही एक जात नाही का होऊ शकत...

द्या ठिबक त्याला कशाला सात बारा लागतोय...

आठवा शिवशाहीचा काळ,

गडावरुन बियाणे मिळत होते शेतकर्‍याला

तो राजा फक्त राजकारना पुरताच उरला का ?

दुष्काळात अन्नधान्य पुरविले जायचे,

जनावरांना छावण्या मिळायाच्या म्हणे

आता कत्तलखान्याला सबसिडी देताय...

आम्ही फक्त थोड्याशा सोई मागतोय...

सगळ्याला सगळं मिळू द्या
बाकी परतफेड तर तुम्हाला जगवून करतोय.

Post a Comment

 
Top