0

तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील रामेश्‍वर जुंदळे खून प्रकरणातील शार्पशूटरना कर्नाटकातून पकडले असून, लक्ष्मी दहिवडी येथून एका राजकीय पुढार्‍याला उचलण्यात आल्याची माहिती एका विश्‍वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मी दहिवडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रामेश्‍वर जुंदळे यांची २७ जून रोजी १२.३0 वाजता गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या पथकानेही घटनास्थळी जाऊन पाहणी करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. खून झाल्याच्या दिवशी पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी स्वत: लक्ष घातले होते. ते मंगळवेढा येथे रात्री १२ वाजेपर्यंत बसून होते. विरेश प्रभू यांच्या पथकातील पो.नि. नितीन कौसडीकर, मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर करांडे, पो.नि. सालार चाऊस यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत जुंदळे यांच्या फोनवरील कॉल तपासणी करण्यासाठी सुमारे १0 ते १२ महिला, एका माजी आमदाराच्या पुतण्यासह अनेकांची कसून चौकशी केली. खून प्रकरणामध्ये मारेकर्‍यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्यामुळे खुनाबाबतचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांच्या कालावधीत नंदुर येथे अशाप्रकारे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. परंतु आत्तापर्यंत नंदुर खून प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. असे असताना लक्ष्मी दहिवडी येथील खून प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी या खून प्रकरणात स्वत: लक्ष घालत खुनाबाबतची प्रत्येक अपडेट त्यांनी घेतली होती. पोलीस अधीक्षक विरेश प्रभु यांनी आपल्या टीमसह मोठय़ा आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जात कर्नाटकातून खुनाची सुपारी घेतलेल्या मारेकर्‍यांना व लक्ष्मी दहिवडी येथील एका राजकीय पुढार्‍याला ताब्यात घेतल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, लक्ष्मी दहिवडी येथे आज (दि. ११) सकाळपासून या खूनप्रकरणाबद्दल जोरदार चर्चा चालू होती. रामेश्‍वर जुंदळे खूनप्रकरणी एका राजकीय पुढार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हा खून राजकीय पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. या खूनप्रकरणी लक्ष्मी दहिवडीतून त्या राजकीय पुढार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

 
Top