0

नेते प्रचारात तर अधिकारी इलेक्शन ड्युटीत व्यस्त
सुमारे ८0 टक्के बागांवर तेल्याचे संक्रमण

शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळण्याची गरज

लक्ष्मीदहिवडी / दत्तात्रय नवत्रे
        मंगळवेढा तालुक्यातील डाळिंब फळबाग शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे. तालुक्यातील बहुतांश बागा तेल्या रोगाने गेल्या असून अनेक शेतकरी संकटात सापडले असताना याकडे कृषी विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत असून या विभागाकडून फळबागांची साधी पाहणीही केली जात नाही. तालुक्यातील महमदाबाद (शे), लक्ष्मीदहिवडी, गुंजेगाव, सलगर, मारोळी या भागातील प्रत्येक बागांवर तेल्याचे संक्रमण झाले आहे. अनेक शेतकर्‍यांनी या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी लाखो रूपये खर्च करून परत दुसर्‍यांदा पानगळ करण्याचा मार्ग अवलंबला आहे. सदर रोग कोणत्याच औषधाने आटोक्यात येत नाही. त्यामुळे तेल्यासमोर शेतकर्‍यांनी गुडघे टेकले आहेत. दुकानदार जे सांगेल ते औषधे फवारून अनेक शेतकर्‍यांचा एकरी लाखाच्यावर खर्च गेला असूनही तेल्याचा अटकाव न झाल्याने अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. याबाबत अनेक शेतकर्‍यांनी कृषी विभागाशीही संपर्क साधला असून झालेल्या नुकसानीची पाहणी करून आमच्या व्यथा शासनाला कळविण्याविषयी मागणीही केली. परंतु, शेतकर्‍यांच्या या मागणीकडे कृषी विभागही पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे तर नेतेमंडळींचे निवडणूक प्रचार सुरू आहेत. त्यामुळे सध्यातरी शेतकरी पूर्णपणे तेल्याच्या कचाट्यात सापडला आहे. कोट्यवधी रूपये खचरून शासनाने सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र उभारले आहे. परंतु, या रोगावर कोणतेच संशोधन केल्याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नसल्याने या संशोधन केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे

Post a Comment

 
Top