सात जणांनी मारली बाजी ?
दोघांना चाखावा लागला पराभव ?
चारजण राहिले माजी ते 'माजी'च... ?
कमी, जास्त जागा; पक्षसंघटनेची ताकद
परगावी राहत असलेल्या पै-पाहुण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणे यांसह विविध कारणास्तव स्थानिक पातळीपासून ते परदेशापर्यंत प्रवास हा करावाच लागतो, याबाबत आपण सारे जाणून असालच. नेमकं याच धर्तीवर म्हणा किंवा आणखीन काही... अपक्ष ते पक्ष असा राजकीय प्रवास केलेले दोन लोकप्रतिनिधी तर विधानपरिषद ते विधानसभा (व्हाया लोकसभा) या मार्गाने राजकीय वाटचाल सुरू ठेवलेले एक लोकप्रतिनिधी सोलापुरी राजकारणात आपली 'राजकीय मुशाफिरी' करीत आहे. माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बाश्री विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप सोपल व पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके हे दोघेही मागच्यावेळी 'अपक्ष' म्हणून निवडून आले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत आ. सोपल हे 'राष्ट्रवादी'च्या 'घड्याळ' या चिन्हावर तर आ. भालके हे कॉंग्रेसच्या 'हात' या चिन्हावर निवडणूक लढवित विजयश्री खेचून आणली. तर इकडे 'लोकमंगल'कार म्हणून सर्वदूर परिचित असलेले आ. सुभाष देशमुख यांनी विधानपरिषद ते (व्हाया लोकसभा) विधानसभा असा राजकीय प्रवास केल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, सोलापूरच्या राजकीय (रणभूमी नव्हे बरं का!) भूमीवर घडलेले काही गंमतीशीर घटना-घडामोडींचा विचार करता त्या एका अर्थाने 'अस्सल सोलापुरी' या प्रकारातील आहेत, असे म्हणण्याची संधी नक्कीच आहे. आता हेच पहा ना, 'स्टॅंडिंग एमएलए' म्हणून जिल्ह्यातील नऊ लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची संधी देण्यात आली होती. यात आ. गणपतराव देशमुख (शेकाप) आ. विजयकुमार देशमुख (भाजपा) आ. प्रणिती शिंदे, आ. भारत भालके (दोघेही कॉंग्रेस) आ. बबनदादा शिंदे, आ. दिलीप सोपल, आ. हनुमंत डोळस (तिघेही राष्ट्रवादी कॉंग्रेस) ह्या सात जणांनी बाजी मारली. तर अक्कलकोट विधानसभा मतदार संघातून सिद्रामप्पा पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून दिलीप माने यांना मात्र पुन्हा एकदा संधी मिळूनही पराभव चाखावा लागला. नरसय्या आडम, उत्तमप्रकाश खंदारे, विश्वनाथ चाकोते व रवीकांत पाटील या चौघांना मतदारांनी पसंती दर्शविली नसल्याने ते चारजण 'माजी'च राहिले आहेत. जिल्ह्यातील गतवेळची आणि सध्य परिस्थितीतील पक्षीय बलाबल पाहता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पाच जागांवरून चार जागांवर आली म्हणजेच या पक्षाची एक जागा कमी झालेली आहे. कॉंग्रेसने मात्र दोन जागांवरून तीन जागांवर उडी घेतली म्हणजेच एका जागेची भर पाडून घेतली. भारतीय जनता पार्टीकडे मागच्या वेळी दोन जागा होत्या आणि याहीवेळी दोनच जागांवर विजय मिळविला आहे. शेतकरी कामगार पक्षाने सांगोला विधानसभा मतदार संघ हा आपल्या हक्काचा मतदार संघ आहे, हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखविला आहे. एक मात्र खरे की, यंदाची निवडणूक ही ज्या त्या पक्षाने स्वतंत्रपणे लढल्याने त्या त्या पक्षाची जिल्ह्यातील ताकद किती आहे, हे अजमाविता आले आहे, असे राजकीय अभ्यासकांतून सांगण्यात येते. शिवसेनेने मोठा गाजावाजा करत, जिल्ह्यातील अनेक रथी-महारथींना आपल्या कळपात ओढून उमेदवारी बहाल केली होती. परंतु, आ. नारायण पाटील यांच्या रुपाने शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यात केवळ म्हणजे केवळ एकच आमदारपद आले आहे. आ. नारायण पाटील यांनी निसटता का होईना विजय संपादन करत, शिवसेनेची राजकीय लाज राखली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यंदाच्या विधानसभा निवडणुकीद्वारे करमाळा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आ. नारायण पाटील, मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आ. रमेश कदम हे दोन नवीन चेहरे जिल्ह्याला मिळाले आहेत. तर दुसरीकडे गतवेळी शामलताई बागल व प्रणिती शिंदे यांच्यारुपाने जिल्ह्यात महिला आमदारांची संख्या दोन एवढी होती. आता मात्र, आ. प्रणिती शिंदे यांच्यारुपाने केवळ एकच महिला आमदार जिल्ह्याला लाभले आहे. -श्रीनिवास गाजूल
Post a Comment