0

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
२५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढविलेले उद्योजक समाधान आवताडे यांना पहिल्याच प्रयत्नात सुमारे ४१ हजार मते मिळाली. आवताडे यांची राजकारणातील एन्ट्री व त्यांना मिळालेला प्रतिसाद हा मंगळवेढेकरांसाठी एक आशेचा किरण ठरला आहे. काहीतरी करून दाखविण्याचे 'व्हिजन' असलेला हा तरुण उद्योजक येणार्‍या काळात राजकारणात देखील करामत करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी आशा आता मंगळवेढेकरांना वाटू लागली आहे. आवताडे यांनी अतिशय अल्पवेळात मतदारसंघात पोहचून आपली भूमिका सक्षमपणे मांडली. राजकीय संघर्षाच्या परिस्थितीत एकाकी लढत दिली. मतदारसंघात शिवसेनेची ताकद अत्यल्प आहे. त्यापेक्षा सेनेबद्दलचा एक वेगळाच लौकीक आहे. या सर्व परिस्थितीत सेनेची उमेदवारी मिळविणे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करून जिल्ह्यात सर्वाधिक यशस्वी केली. यामुळे खुद्द ठाकरे देखील आवताडे यांच्यावर कमालीचे खूश झाले. आवताडे यांनी अपुर्‍या राजकीय बळाचा पुरेपूर वापर केला. वैयक्तीक राजकीय अनुभव कमी असताना विधानसभेची मोठी निवडणूक त्यांनी लढविली. त्यांच्याबद्दल अपप्रचार करण्यात अनेकांनी धन्यता मानली. तर त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांची निवडणुकीत मोजमाप केले नाही. यामुळे परिचारक गटाला मोठा धक्का बसला. तर आ. भालके गटाला निसटता फटका बसला. पंढरपूर शहरात आवताडे यांना अपेक्षेइतके मतदान झाले नाही. पंढरपूरमध्ये शिरकाव करण्यास संधी मिळाली. परंतू माफक यशाची अपेक्षा असताना तेही मिळाले नाही. परंतू याचवेळी आ.भालके, परिचारक यांना तिसरा पर्याय म्हणून आवताडे ठामपणे उभा राहू शकतात. हे आवताडे व त्यांच्या सर्मथक कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत दाखवून दिले. पहिल्याच प्रयत्नात चाळीस हजार मते मिळविली. मंगळवेढा शहरात आवताडे यांना मोठे मताधिक्य मिळाले. ग्रामीण भागात देखील चांगले मतदान झाले आहे. पंढरपूर शहर व ग्रामीण भागात मिळालेली मते अत्यल्प आहेत. परंतू मतदान का मिळाले नाही याचा विचार करुन आवताडे व त्यांचे सर्मथक यापुढील काळात आपली वाटचाल करतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्‍वास आहे. मंगळवेढा शहरातील मतदारांनी ज्या विश्‍वासाने समाधान आवताडे यांच्यावर विश्‍वास टाकला आहे. त्याला तडा जाणार नाही याची जबाबदारी आवताडे यांना घ्यावी लागणार आहे. यापुढील काळात शहरातील संघटन अधिक मजबूत करत सामाजिक कार्यात अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. तर ग्रामीण भागातील मतदारांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी निवडणूक काळात केलेली भाषणे लक्षात ठेवून त्या पद्धतीने वाटचाल करावी लागणार आहे. यश, अपयश आयुष्यात येते जाते. यशाची दखल घेतली जाते तशी अपयशाची देखील दखल घेतली जाते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे समाधान आवताडे यांना नक्कीच माहित आहे. येत्या पाच वर्षात पायाभरणी करुन इमारत मजबूत उभी करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. कुस्तीत उसनी ताकत आणून जिंकता येत नाही. तसेच राजकारणात देखील इतरांच्या कुबड्या घेवून जिंकता येत नाही. यासाठी स्वबळावर जिंकण्याइतपत स्वत:चीच ताकत निर्माण करावी लागते. मग मात्र यश मिळविणे अवघड जात नाही. हे सर्व गुण आवताडे यांच्याकडे आहेत. यात ते अधिक वृद्धी करतील अशी अपेक्षा मतदारसंघातील जनतेतून व्यक्त होत आहे.      

Post a Comment

 
Top