0

.पंढरपूर / शहर प्रतिनिधी
दिपावली सणातील एक प्रमुख असलेल्या लक्ष्मीपूजनाचा विधी शहर व तालुक्यात घरोघरी मोठय़ा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शहरात हिशोबाच्या वह्या तसेच झेंडूची फुले खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसत होते. आठवडाभरापासून शहर व तालुक्यात दिपावली सणाची लगबग सुरू आहे. वर्षभरातील हा सर्वात मोठा सण असल्याने नवीन कपड्यांपासून दागिने, संसारोपयोगी वस्तू, नवीन वाहनांपर्यंत सर्वच बाबतीत खरेदीला उधाण आल्याचे दिसून येत आहे. दिपावली सणातील लक्ष्मीपूजनालाही अनन्यसाधारण महत्व असते. गुरूवारी (दि. २३) लक्ष्मीपूजन असल्याने घरोघरी अबालवृध्दांची लगबग दिसून येत होती. व्यापारी वर्ग वर्षभर लागणार्‍या हिशोबाच्या वह्या या दिवशी खरेदी करून विधीवत पूजन करतात. त्यामुळे येथील सर्वच स्टेशनरी दुकानांमध्ये हिशोबाच्या नवीन वह्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत होती. हजारोंच्या संख्येने या वह्यांची विक्री झाली. विशेषत: लक्ष्मीचे चित्र असलेल्या वह्यांना व्यापार्‍यांची अधिक पसंदी असल्याचे दिसत होते. कांही स्टेशनरी दुकानदार अशा वह्यांसोबत लक्ष्मीचे छायाचित्र मोफत देत होते. लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले येथील स्टेशनरोड, भादुले चौक, नाथ चौक परिसरात मोठय़ा प्रमाणावर विक्रीसाठी आली होती. दुपारपासून फुले खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसत होते. ४0 ते ६0 रूपये किलो दराने फुलांची, तर २५ ते ५0 रूपयांपर्यंत तयार हारांची विक्री झाली. सायंकाळी फुलांचा बाजार फुलून गेला होता. रात्री घरोघरी तसेच दुकानांसमोर आकर्षक रांगोळी काढून वह्या-पुस्तके, हिशोबाचे दफतर, नवीन आणलेल्या वह्या, संगणक आदींचे विधीवत पूजन करण्यात आले. विद्यार्थीही आपापली पाट्य-पुस्तके पूजन करून दर्शन घेताना दिसत होते. याचबरोबर रोख रक्कमेचेही विधीवत पूजन करण्यात आले. रात्री शोभेच्या फटाक्यांसह अगदी मंगलमय वातावरणात लक्ष्मीपूजनाचा हा सोहळा उत्साहात साजरा झाला.

Post a Comment

 
Top