मंगळवेढा /
कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांना मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाणीप्रश्न सोडविल्यामुळे दुष्काळी जनतेने भरभरुन मतदान केले. शिवाय गेल्या पाच वर्षात सामान्य जनतेला केलेली मदत, त्यांच्याशी ठेवलेला संपर्क जातीयवादाला दिलेली मुठमाती यामुळेच अटीतटीच्या लढतीत आ. भालकें सरस ठरले. याचवेळी परिचारक गटाने पंढरपूर शहर व बावीस गावातील मतदारांना गृहीत धरले त्यामुळेच त्यांना फटका बसला. लोकसभेत भाजपाचे अँड़ शरद बनसोडेंचा विजय पाहता परिचारक गटाने अधिक काळजी घेणे आवश्यक होते. गेल्या ३५ ते ४0 वर्षात कै. औदुंबरआण्णा पाटील यांच्यापासून विठ्ठल परिवाराला परिचारक गटाचा पराभव करता आला नव्हता. तो आ. भालके यांनी करून दाखविला. इतकेच नव्हे तर गेल्या निवडणूकीत आ. भालके अपघाताने विजयी झाले या परिचारक गटाच्या आरोपाला या निकालातून आ. भालकेंनी अपघातातून नव्हे तर स्वकर्तृत्वातून गेल्या वेळी व यावेळीही विजयी झालो असल्याचे दाखवून दिले. आ. भालके यांच्या यशात बदललेली राजकीय समीकरणे, मोहिते-पाटील गटाचा पाठिंबा, ढोबळे गटाचे सहकार्य महत्वपुर्ण मानले जात आहे. याच वेळी 'जेथून माघार तेथून सुरुवात' म्हणत असताना 'परत तिथेच माघार' घ्यावी लागली असे दुर्दैवी चित्र परिचारक गटासमोर सध्या तरी उभे राहिले आहे. परिचाराकांच्या चार वर्षाच्या प्रयत्नाच्या तुलनेत शिवसेनेचे समाधान आवताडे यांना अवघ्या तीन महिन्यात मंगळवेढेकरांनी 'भूमिपुत्र' म्हणून डोक्यावर घेतले. निवडणूक जाहीर होण्यापुर्वी व नंतरही आ. भालके मतदारसंघात अडचणीत असल्याचे चित्र दिसत होते. एकूणात मंगळवेढय़ात देखील चर्चेत ते बाजूला होते. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण वातावरण बदलून गेले. प्रशांत परिचारक यांना पंढरपूर प्रमाणे मंगळवेढय़ाची जनता मतदान करण्यास तयार होती. परंतू सहकारी निवडताना चुकीच्या निवडी झाल्या. गेली तीस वर्षे तालुक्यातील सत्ता भोगणार्या लोकप्रतिनिधींचा कारभार करणारांना परिचारक गटाने जवळ केले. अनेक वर्षे ही मंडळी सत्तेत राहिली असल्यामुळे तालुक्यातील अनेकांना त्यांचा कधीतर फायदा तर अनेकवेळा त्रास झाला आहे. परिचारक विजयी झाल्यास हीच मंडळी पुन्हा सत्ता गाजवतील व आपल्याला त्रास होईल, या भितीपोटी अनेकांनी मार्ग बदलला. मंगळवेढय़ात येण्यासाठी परिचारक गटाला दुसरे कार्यकर्ते नव्हते असे सांगून वेळ मारुन नेली जात आहे. अख्ख्या तालुक्यात पाच कार्यकर्ते वगळता परिचारक गटाला स्वच्छ, नवीन, तरुण कार्यकर्ते मिळाले नाहीत. युटोपियन कारखाना, पंढरपूर अर्बन बँक, दुध संघ, बाजार समिती, नगरपालिका आदी संस्था असताना सुद्धा केवळ मंगळवेढय़ात प्रचाराच्या नियोजनाचे व्यवस्थापन करता आले नसल्यामुळे मंगळवेढय़ातील कपबशी चहा न पीता फुटली. पंढरपूर शहर व तालुक्यातील २२ गावांनी आ. भारत भालके यांच्यासह प्रशांत परिचारक यांना जवळपास समान मते दिली असली तरी मंगळवेढा शहरासह तालुक्याने दिलेल्या निर्णायक आठ हजार मताच्या आघाडीमुळे आ. भालके यांचा विजय सुकर झाला. तर दुसरीकडे अनेकांना बरोबर घेऊन देखील समाधान आवताडे यांना पंढरपूर शहरात अपेक्षित मतदान झाले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment