दुष्काळी तालुक्यात चार साखर कारखान्यांचे धुराडे पेटणार
मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठय़ा वेगाने वाढत आहे. भिमाकाठासह लिफ्ट इरीगेशन वाढल्यामुळे ऊसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. वाढीव ऊसाचे क्षेत्र समोर ठेवून तालुक्यात तीन खाजगी साखर कारखाने उभारण्यात आले. यंदा तालुक्यात चार साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. एकेकाळी केवळ भीमानदी काठाला तेही नदीच्या उजव्या भागात ऊसाचे क्षेत्र होते. नंतर माजी आमदार मारवाडी वकील यांनी लिफ्ट इरिगेशन केले. तेव्हा बोराळे, अरळी भागात बागायत क्षेत्र वाढले, नंतर भीमा नदीच्या दोन्ही बाजूला ऊसाचे क्षेत्र वाढत गेले. तालुक्यात युती सरकारच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी उजनीचे पाणी आणले. हे पाणी आणल्यानंतर ऊसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. गुंजेगाव, भिकार अकोले, कचरेवाडी, डोंगरगाव, हाजापूर, फटेवाडी, भालेवाडी, तळसंगी, नंदूर, डोणज, मरवडे, खोमनाळ हा पट्टा ऊसाचा पट्टा म्हणून आता सध्या ओळखला जात आहे. अशा परिस्थितीत पाण्याची पातळी काही भागात उंचावली तर सिमेंट बंधारे, ओढा, नाला, रिग्रेडेशन, माण नदीच्या पात्रात घरनिकी, मारापूर,गुंजेगाव, ढवळस, धर्मगाव, मुढवी असे बंधारे झाले. यामुळे माणनदी काठाला सुद्धा ऊसाचे क्षेत्र वाढले. तालुक्याच्या दक्षिण भागात पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम असताना दुसर्या बाजूला ऊसाचे क्षेत्र मोठय़ा वेगाने वाढत गेले. एकट्या सिद्धापूरमध्ये दीड लाख मेट्रीक टन ऊसाचे उत्पादन होत आहे. सिद्धापूरच्या ऊसावर एक कारखाना सव्वा ते दीड महिना चालू शकतो. यामुळे येत्या काही वर्षात मंगळवेढय़ाची ओळख बदलली जाणार आहे. ३५ गाव पाणी योजनेचे पाणी आल्यानंतर, तालुक्यात हरितक्रांती होणार असून सर्वत्र सुबत्ता येणार आहे. सध्या दामाजी सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर, युटोपियन शुगर, फॅबटेक शुगर असे चार कारखाने तालुक्यात ऊस गाळपासाठी सज्ज झाले आहेत. यामुळे उत्पादीत झालेल्या ऊसाला तालुक्यातच न्याय मिळणार आहे. बैलगाडीने ऊस जाण्याची शक्यता अधिक असल्याने ताजा ऊस लवकर गव्हाणीत जाणार आहे. यामुळे शेतकर्याला चांगले वजन व दर मिळणार आहे तर कारखान्याला अधिक साखर काढण्यास चांगली संधी मिळणार आहे. यामुळे भविष्यात तालुक्याची अवर्षणप्रवणग्रस्त तालुका म्हणून असलेली ओळख पुसली जाणार आहे. दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा तालुका भविष्यात दाम असलेला तालुका म्हणून ओळखला जाणार आहे. शेतकर्याला निश्चित नफा देणारा ऊस तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Post a Comment