0


'हेच का अच्छे दिन' शेतकर्‍यांतून तीव्र संताप ?

कांद्याचे भाव गडगडले ?
केलेला खर्चही निघेना

लक्ष्मीदहिवडी / दत्तात्रय नवत्रे

कांदा उत्पादक शेतकरी सध्या दर कमी आल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. याचाच प्रत्यय नुकताच लक्ष्मीदहिवडी (ता. मंगळवेढा) येथील तुकाराम      टाकळे या शेतकर्‍याला आला असून त्यांनी कांद्याच्या नऊ गोण्या कोल्हापूर मार्केटला नेल्या होत्या. मार्केटमध्ये त्या नऊ गोण्यांचा लिलाव होऊन सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हाती फक्त ५३ रूपये आल्याने त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. हेच का शेतकर्‍यांसाठी अच्छे दिन असे म्हणून त्यांनी परतीचा प्रवास केला. लक्ष्मीदहिवडी हे कांदा पिकवणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. फार मोठय़ा प्रमाणावर या परिसरात कांदा पिकवला जातो. पण, कांद्याचे दर पूर्णपणे पडल्याने कांदा बियाण्यापासून केलेला खर्चही निघत नसल्याने अनेकजण कर्जबाजारी होत आहे. तुकाराम टाकळेंनी नऊ गोणी कांदा कोल्हापूर येथे वाहनाने विक्रीसाठी नेला, त्यांच्या एकूण कांद्याचे वजन ४९६ किलो भरले. त्यातून त्यांना ७५८ रूपये मिळाले. त्या पैशामधून ६0५ रूपये भाडे, ३६ रूपये ७0 पैसे हमाली, ४५ रूपये ५0 पैसे कमीशन, १३ रूपये ३0 पैसे तोलाई व ४ रूपये ५0 पैसे गोडावून भाडे असे ७0५ रूपये वजा करून त्यांना ५३ रूपये कांदापट्टी हाती दिली. ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना आश्‍वासने देऊन अच्छे दिन येणार म्हणून मते पदरात पाडून घेतली, त्यांनीच आता शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे हे असेच सुरू राहिले तर शेतकर्‍यांच्या रोषास सरकारला सामोरे जावे लागणार आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Post a Comment

 
Top