आंधळगावच्या यशस्वी शेतकर्याची यशोगाथा
शेवटपर्यंत ४0 टन उत्पन्न अपेक्षित .
दत्तात्रय नवत्रे
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावातील आंधळगाव हे एक गाव. पिण्याच्या पाण्यासाठीही पायपीट. पण विहिरीच्या जेमतेम पाण्यावरही शेडनेट हाऊसच्या माध्यमातून आपण यशस्वीपणे ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेऊ शकतो हे या गावातील आबासाहेब सदाशिव माळी यांनी दाखवून दिले आहे. २0 गुंठे शेडनेटमध्ये लावलेल्या ढोबळी मिरचीतून आतापर्यंत सात टन मिरचीचे उत्पादन निघाले असून सव्वा महिन्यात त्यांना पावणेदोन लखाचे उत्पन्न मिळाले आहे.मंगळवेढा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या अर्थसहाय्याने माळी यांनी शेडनेट हाऊसची उभारणी केली. मिरची जागेवरती येऊन व्यापारी खरेदी करतात. २१ ते ३0 रूपये दराने मिरचीची विक्री होत असून यापासून सव्वा महिन्यात पावणेदोन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. शेवटपर्यंत त्यांना ४0 टन मिरचीचे उत्पादन निघणे अपेक्षित आहे. दुष्काळी भागात शेडनेट हाऊस उभारून त्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.२८ मीटर बाय ७२ मीटर आकारमानात उभारलेल्या या शेडनेट हाऊससाठी ८ लाख ६२ हजार ८३९ रूपये खर्च आला. या खर्चामधील निम्मी रक्कम एन.एच.एम. नॉर्मसप्रमाणे शासनाकडून अनुदान मिळाले तर निम्म्या रकमेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, ब्रह्मपुरी या बँकेने अर्थसहाय्य केले आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही त्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याने त्यांना कृषी सहाय्यक पिंजारी, मंडल अधिकारी अशोक कांबळे यांनी त्यांना वारंवार सहकार्य करून एक यशस्वी शेतकरी बनविले आहे. सध्या तालुक्यात कृषीक्रांती फार्र्मस क्लब हा शेतकरी गट असून माळी यांच्यासह गटातील २0 शेतकर्यांनी शेडनेट हाऊस उभारले आहेत. शेडनेट शेतीच्या उपक्रमाबाबत पुण्यनगरीशी बोलताना आबासाहेब माळी म्हणाले की, कृषीक्रांती फार्र्मसचे अध्यक्ष अंकुश पडवळे, संभाजी नागणे, सुनील पाटील, शरद हेंबाडे, आण्णा वाले, सोमनाथ नकाते यांचे पूर्णपणे सहकार्य लाभले आहे. आतापर्यंत ७ टन मिरची निघाली असून उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. तरीही ४0 टन उत्पन्न उपेक्षित असून शेडनेटचा सर्व खर्च या पिकामध्येच निघेल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सोबतीला त्यांची पत्नी सुशीला माळी व तीन मुले प्रदीप, प्रशांत व प्रमोद माळी हे देखील शेतात कष्ट करतात. त्यांच्याच कष्टाचे हे सारे फळ असल्याचेही माळी म्हणाले. तसेच त्यांनी, इतर शेतकर्यांनीही कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन कमी खर्च व कमी पाणी असतानाही जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे शेतकर्यांना आवाहन केले.
आबासाहेब माळी : ७७0९१५७४२0
Post a Comment