0

प्रांताधिकार्‍यांना आ. भालके यांच्या सूचना
मंगळवेढा / प्रतिनिधी
तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्षे, डाळिंब, कांदा, टॉमटो, करडई, ज्वारी, सूर्यफुल आदी पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आ. भारत भालके यांनी मंगळवेढा विभागाचे प्रांताधिकारी श्रावण क्षीरसागर यांना दिलेल्या आहेत. मंगळवेढा तालुक्यात गेल्या ४-५ दिवसापासून अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. द्राक्षे व डाळिंब बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांची आर्थिक हानी झालेली आहे. अवकाळी पावसामुळे या बागांवर तेल्या, दावण्या, करपा या रोगाने थैमान घातले असून पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच तालुक्यात ज्वारीची पेरणी मोठय़ा प्रमाणात झालेली असून ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफुल या पिकांवर रोग पसरला आहे. मंगळवेढा शिवारात ज्वारीचे पिक चांगल्या दर्जाचे आलेले होते. शेतकरी वर्गातून ज्वारीच्या पिकाच्या उत्पन्नाविषयी समाधान व्यक्त केले जात असताना अवकाळी पावसामुळे दणका दिल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकर्‍यांच्या नुकसानाविषयी पॅकेज जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत पश्‍चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांची झालेली नुकसान भरपाई राज्य शासनाने तात्काळ दिली पाहिजे, अशी मागणी आ. भालके यांनी राज्य शासनाकडे केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांना शासकीय मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातून आ. भालके यांनी प्रांताधिकारी श्रावण क्षीरसागर यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

 
Top