0


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षभरात केलेल्या कारवाईत पुणे विभाग राज्यात आघाडीवर राहिला आहे. पुणे, सातारा, सांगली,  सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये या वर्षभरात भ्रष्टाचाराच्या 206 प्रकरणांमध्ये 219 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महसूल विभाग यात आघाडीवर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्याचं सत्ताकेंद्र असलेली आणि सर्वाधिक आर्थिक व्यवहार होणारी मुंबई मात्र चक्क आठव्या क्रमांकावर आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पुणे विभाग राज्यात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. महत्वाचं म्हणजे मागील वर्षी जानेवरी ते डिसेंबर 2013 या कालावधीत पुणे विभागात भ्रष्टाचाराची 106 प्रकरणं उघडकीस आली होती. यावर्षी ही संख्या वाढून 206 वर पोहोचली आहे. तसंच ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवण्याच्या 12 प्रकरणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
या पाच जिल्ह्यांमध्ये लाच घेतल्याच्या प्रकरणांची आकडेवारी खालीलप्रमाणे
पुणे - 76
सातारा – 26
सांगली – 32
सोलापूर – 43 
कोल्हापूर- 29

भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात पुण्यापाठोपाठ नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण राज्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांची संख्या मागील वर्षीच्या 586 कारवायांच्या तुलनेत 1189 वर पोहोचली आहे. सर्व राज्यात भ्रष्टाचाराची प्रकरणं वाढल्याचं दिसत असतानाच राजधानी मुंबई मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमध्ये चक्क आठव्या स्थानी आहे.

मुंबई शहरात या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 90 कारवाया केल्या आहेत. शहर म्हणून मुंबईत झालेल्या कारवाया या राज्यातील ईतर कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक आहेत. पण विभाग म्हणून मुंबई अगदी नांदेड आणि अमरावातीच्याही खाली अगदी आठव्या क्रमांकावर आहे.

मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी असलेली वेगळी रचना याला कारणीभूत आहे का आणि अशी रचना मुंबईतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मुद्दाम तर केलेली नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झालेली दिसत असली तरी, ही प्रकरणं म्हणजे भ्रष्टाचाररुपी हिमनगाची केवळ टोकं आहेत.  शिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर शिक्षा होण्याचं प्रमाण 25 टक्क्यांच्या घरातच आहे.

भ्रष्टाचारात कोणतं खातं आघाडीवर?
लाचलुचपत विभागाच्या कारावाईत राज्यातील महसुल विभाग आघाडीवर आहे . महसुल विभागातील 410 अधिकाऱ्यांना या वर्षभरात राज्यातील विविध प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे.

- महसूलपाठोपाठ पोलीस खातं भ्रष्टाचारात दुसऱ्या क्रमांकावर आहे
- पंचायत समित्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी तिसर्या क्रमांकावर आहे.
- चौथ्या क्रमांकावर महापालिका कर्मचारी आहेत
- पाचव्या क्रमांकावर राज्यांच शिक्षण खातं आहे
- सहाव्या क्रमांकावर राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी  आहेत

Post a Comment

 
Top