0

अकलूज / तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या पार्श्‍वभूमीवर आता केंद्र शासनही देशात आदर्श जिल्हा परिषद, आदर्श पंचायत समिती आणि आदर्श ग्रामपंचायती हे पुरस्कार सुरू करणार आहे. माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना. विरेंद्रसिंग चौधरी यांनी याबाबतचा निर्णय सांगितला. खासदार मोहिते-पाटील हे ग्रामविकास मंत्री असताना महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींनी आपआपल्या कार्यात सुधारणा कराव्यात या हेतुने आदर्श जिल्हा परिषद, आदर्श पंचायत समिती आणि आदर्श ग्रामपंचायती असे पुरस्कार विभागवार देणे सुरू केले होते. सन २00५ पासून हे पुरस्कार दिले जातात. असेच पुरस्कार केंद्र शासन देशपातळीवर देऊ शकेल काय? या मुद्याकडे माढय़ाचे खासदार मोहिते-पाटील यांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधुन घेतले. गुरूवारी लोकसभेत त्यांनी या संदर्भातील थेट प्रश्न विचारला. त्यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना.. चौधरी यांनी सन २0१४-१५ या वर्षापासुन केंद्र शासन असे पुरस्कार देणे सुरू करेल, असे सांगितले. केंद्र शासनाच्या राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानांतर्गत पुढील वर्षापासुन असे पुरस्कार देण्यास सुरूवात होईल, असे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले. आपण ग्रामविकास मंत्री असताना राज्यात असे पुरस्कार देणे सुरू केल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या कामात मोठय़ा प्रमाणात सुधारणा झाली होती. केंद्राच्या या निर्णयानंतर देश पातळीवरील पंचायत राज यंत्रणा आणखी बळकट होऊन त्यांच्या कारभारात सुधारणा होईल, असे खासदार मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

 
Top