खंडाळी / प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील व्यापारी व उपसरपंच सुभाष गांधी व त्यांची दोन मुले स्वरूप गांधी व शितल गांधी यांना शुक्रवार, दि. १६ जानेवारी २0१५ रोजी सकाळी ९.३0 च्या सुमारास खंडाळी येथील अमोल बाबुराव पताळे व अतुल महावीर पताळे यांनी शिवीगाळ करून आमच्याविरूद्ध पोलिसात केस देता काय म्हणून दमदाटी करून दुकानात घुसून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
वेळापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष गांधी हे सकाळी ९.३0 वाजण्याच्या सुमारास दुकानात गिर्हाईकाबरोबर बोलत असताना गावातील मारूती मंदिराकडून अमोल पताळे व अतुल पताळे हे दोघे हातात लाकडी दांडके घेऊन दुकानात घुसले, सुभाष गांधी यांना शिवीगाळ करून आमच्याविरूद्ध पोलिसात केस देता काय? असे म्हणून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करू लागले, स्वरूप व शितल गांधी हे त्यांना सोडविण्यास गेले असता त्यांनी शितल गांधी यांच्या उजव्या पायावर नडगीवर मारून हाड मोडले व स्वरूप गांधी यांना डोक्यावर लाकडी दांडक्याने मारून डोके फोडून रक्तबंबाळ केले. सुभाष गांधी यांच्याही डोक्याला मार लागला असून कपाळावर जखम झाली आहे.
सुभाष गांधी व स्वरुप गांधी यांच्यावर वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर शितल गांधी यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याने त्यांच्यावर अकलूज येथे शस्त्रक्रिया केली आहे. अमोल पताळे व अतुल पताळे यास वेळापूर पोलिसांनी अटक केली असून हवालदार व्यवहारे अधिक तपास करीत आहेत. दि. १ जानेवारी २0१५ रोजी माझे नातेवाईक संजय दोशी यांना खंडणी मागितली होती. अमोल पताळे यास सापळा रचून वेळापूर पोलीसांनी रंगेहाथ पकडले होते. तो सध्या जामिनावर सुटून आला असून त्याचाच राग मनात धरून अमोल पताळे व अतुल पताळे यांनी माझ्यावर व माझ्या मुलांवर हल्ला केला असल्याचे सुभाष गांधी यांनी सांगितले
Post a Comment