0

डॅशिंग उदयनराजेंचं बेधडक मत

पुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे ही माणसं समाज प्रबोधनाचं काम करत होती. त्यांच्यावर गोळीबार होणं ही शोकांतिका आहे. सरकार कोणतं होतं याच्याशी मला देणं- घेणं नाही. पानसरेंचे मारेकरी सापडल्यास त्यांना तातडीने गोळ्या घाला, असं रोखठोक मत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते. “दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत हे दुर्दैव आहे. शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक होते हीच भूमिका पानसरेंनीही मांडली. मात्र त्यांच्यावर गोळीबार होतो, ही शोकांतिका आहे. राजकारण्यांनी याचा गंभीर विचार करून, या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी तातडीने पावलं उचलावी. या मारेकऱ्यांना गोळ्या घाला”, असं उदयनराजे म्हणाले.
कायदे कडक करा
सध्या पोलिसांचा वचकच राहिला नाही. मारेकरी सापडत नाहीत. जर सापडले तर त्यांना जामीन मिळतो. पहिल्यांदा आपले कायदे कडक करायला हवे, असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.

जे आम्हाला जमत नाही ते दाभोलकर, पानसरेंनी केल

जे आम्ही किंवा आजचे तरूण करत नाहीत, ते समाज प्रबोधनाचं काम दाभोलकर, पानसरे यांनी एस टीने प्रवास करून केलं. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकातील भूमिकेचं शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी समर्थन केलं आहे. तसंच कोणत्याही ठिकाणची धार्मिक हिंसा वाढण्यासाठी तिथले लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मोदी सरकारला चॅलेंज
उदयनराजे यांनी भू- संपादन विधेयकावरून मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे. भू- संपादन विधेयकातील सुधारणा अन्यायकारक असल्याचं उदयनराजे म्हणाले. त्यामुळे याला आपला विरोध असून, कोणत्याही चर्चेविना हे विधेयक लादून दाखवावं, सरकारला माझं चॅलेंज आहे, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.
तर नक्षली चळवळीचं नेतृत्त्व करेन
"जमीन सुधारणा विधेयकाचा मुद्दा आता पेटणार आहे. मी याबाबत तज्ज्ञांशी आणि चहावाल्यांशीही चर्चा केली. चहावाल्यांचाही याला विरोध आहे. इतरांठी एम.पी. म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट (खासदार). पण मी म्हणजे मिलीट्री पोलीस. इतका राग येतोय की नक्षली चळवळीचं नेतृत्त्व करायला मागे पुढे बघणार नाही”
राजकारणी सर्वात जास्त नाटकी
“राजकारणी हे सर्वात जास्त नाटकी असतात. निवडणुकांवेळी गरीबांचा कळवळा आल्याच दाखवतात आणि सत्तेत आल्यावर विसरतात. बॉलिवूड, हॉलिवूडपेक्षा पॉलिवूड (पॉलिटिक्स) भारी आहे. ऑस्कर अॅवॉर्ड यांनाच मिळायला हवा” असंही उदयनराजे म्हणाले.By abp

Post a Comment

 
Top