राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची कर्करोगाशी चालू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. २४ नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून कधी प्रकृतीत सुधारणा, तर कधी चिंताग्रस्त अशा स्थितीत त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या कुटुंबीयांना वारंवार त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण करावे लागले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात बोलताना कार्यकर्त्यांना व्यसने न करण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळीही अतिशय भावनाप्रधान भाषण करताना व्यसनामुळे पक्षाला मोठी किंमत मोजावी लागल्याचे त्यांनी सांगितले होते. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना कर्करोगाशी करावा लागलेला संदर्भ त्यांच्या बोलण्यातून होता. तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते. अखेर सोमवारी कर्करोगाने त्यांच्यावर मात केली. आर. आर. यांना आदराने आबा म्हटले जाई. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते. सामाजिक कल्याणाची सातत्याने चिंता करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. कितीही टीका झाली, तरी टीकेने घाबरून न जाता समाजाच्या भल्यासाठी आपण काय करायचे ठरविले आहे, त्यावर ते ठाम राहत. मुंबईत डान्स बार बंदी आणण्याच्या त्यांच्या निर्णयावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या होत्या; परंतु एका महिलेने त्यांना सांगितलेल्या व्यथेने त्यांच्या मनात घर केले होते. ग्रामीण भागातील तरुण मुंबईत येऊन बारबालावर पैसे उधळत. त्यामुळे किती कुटुंबे देशोधडीला लागतात, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. मुंबईत ७५ हजार बारबाला बेरोजगार झाल्याचा टाहो अनेकांनी फोडला. त्यासाठी न्यायालयीन लढाया लढल्या; परंतु आबा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. सर्वोच्च न्यायालयात त्यांचा निर्णय टिकला नाही. आपल्या निर्णयात काय त्रुटी राहिल्या, याचा विचार करून त्यांनी त्यानंतर त्रुटी दूर केल्या. आबांचे वक्तृत्व प्रभावी होते. त्यांच्या वक्तृत्वाला धार होती; परंतु त्यांनी संयम कधी सोडला नाही. १९९५ ते १९९९ च्या काळात युतीचे सरकार असताना विधानसभेत युतीच्या विरोधात गैरव्यवहारावर काहूर उठविण्यात आबाच आघाडीवर होते. संसदीय कामकाज पद्धतीचा त्यांचा चांगला अभ्यास होता. जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वापासून राजकीय धडे गिरवणार्या आबांनी युतीच्या काळात सर्व संसदीय आयुधांचा वापर करून युतीला जेरीस आणले होते. एखाद्याकडे राजकीय पद आले की लक्ष्मी त्यांच्या घरात वास करते, असा समज अलीकडच्या काळात रूढ झाला आहे; परंतु प्रदीर्घ काळ राजकारणात राहूनही आबा यांनी आपल्या प्रतिमेला डाग लागू दिला नाही. राजकारणातील संत म्हणूनच त्यांचा उल्लेख होत असे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत होत असलेल्या आरोपावर उतारा म्हणून आबांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर केला जाई. दोनदा गृहमंत्री, प्रदीर्घ काळ मंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीच्या संपत्तीत फार वाढ होत नाही, हे अलीकडच्या काळातील दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. सत्तेची हवा डोक्यात कधीही न जाऊ देणार्या आबांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्यापासून कधी अवाजवी अपेक्षा केल्या नाहीत. गृहमंत्री झाल्यानंतर ते जेव्हा प्रथम तासगावला गेले होते तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर पाहायला त्यांची मुलगी आली होती. ती गर्दीत हरवल्याचे उदाहरण हे कुटुंब किती सामान्य राहते, हे सांगण्यास पुरेसे आहे. आबा उपमुख्यमंत्री असताना त्यांची पत्नी शेतात काम करीत असे. आई, पत्नी व मुले फक्त सुट्टीत मुंबईला जात. मुले जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकली, यावरून हे कुटुंब किती साधे होते, आबांच्या सच्चेपणाला कुटुंबीयांची किती मनापासून साथ होती, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. अथक काम करण्याची तयारी, शरद पवार यांच्यावर वादातीत निष्ठा आणि पक्षात अन्याय झाला तरी बंड न करण्याची त्यांची वृत्ती होती. राजकारणात असताना त्यांनी कधी विचारांशी फारकत घेतली नाही. त्यांच्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांतही आपुलकीची भावना होती. त्यामुळे २00९च्या निवडणुकीत जेव्हा आबा अडचणीत आहेत अशी माहिती कळली, तेव्हा आपला पूर्वीचा निर्धार बाजूला ठेवून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मेधा पाटकर त्यांच्या तासगाव मतदारसंघात प्रचाराला गेले होते. वैयक्तिक मतभेद, वैचारिक मतभेद असले, तरी आबांनी कुणाशीही मनभेद होऊ दिले नाहीत. वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण त्यांनी कधीच केले नाही. आबांना आव्हाने स्वीकारायला आवडत. त्यामुळे गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी स्वत: होऊन मागून घेतले. तेथे विकासाच्या अनेक योजना राबवल्या. पोलिसांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबवल्या. नक्षलग्रस्त भागात विकासकामे करून त्यांनी तेथे एक विश्वासाचे वातावरण तयार केले. अनेक नक्षलवाद्यांना विश्वास दिल्यामुळे त्यांनी आत्मसर्मपणाचा मार्ग स्वीकारला. आबांचा एक भाऊ पोलीस खात्यात अधिकारी; परंतु दोन्ही भावांनी कायम एकमेकांच्या पदांचा सन्मान केला. मुंबईतील आर. आर. यांच्या एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा भाऊ बंदोबस्तासाठी होता. तरीही त्याच्यासाठी विशेष वागणूक देण्याचा ना त्यांनी आग्रह धरला ना भावाने. ग्रामीण भागातून आल्यामुळे हिंदीवर त्यांचे प्रभुत्व नव्हते. त्याची त्यांनाही जाणीव होती. मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर 'बडी बडी शहरोमे छोटी छोटी घटनाए होती है' असे वक्तव्य त्यांनी केले. ते त्यांच्या अंगलट आले. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा व गृहमंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागला. तरी ते नाऊमेद झाले नाहीत. त्यानंतरही ज्या ज्या खात्याचा कारभार त्यांच्याकडे आला, त्या त्या खात्याला आपल्या कल्पकतेने त्यांनी उंचीवर नेऊन ठेवले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची तर देशपातळीवर नोंद घेतली गेली. त्यांच्यामुळे अनेक गावे स्वच्छ झाली. या योजनेत आबांमुळे चांगले काम झाले. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्मल गाव योजनेत पारितोषिके मिळालेल्या गावांची महाराष्ट्रातील संख्या शेकड्यांत असायची. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेतून अनेक गावांतील वर्षानुवर्षे चाललेले झगडे मिटले. गावांत शांतता नांदायला लागली. सार्वजनिक जीवनात कसे राहावे, याचा आदर्श म्हणून आर. आर. यांच्या जीवनपटाकडे पाहावे लागेल. सभ्यतेनेही राजकारण करता येते, हे त्यांनी दाखवून दिले. शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत श्रमदान करून शिकलेल्या आबांना परिस्थितीची शेवटपर्यंत जाणीव होती. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांचा आपल्यावर मोठा प्रभाव असल्याचे त्यांनी एकदा ब्लॉगवर लिहिलेल्या लेखात नमूद केले होते. आबा संकोची होती. स्वत:बद्दल ते फारच कमी बोलत. आपण केलेल्या कामाविषयीही ते बोलत नसत. आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन महाराष्ट्रातील जनतेने करायला हवे, आपण स्वत: नाही, असे ते मानत. कायम पांढर्या सफारीत वावरणारे आबा पांढर्या सफारीवर डाग पडणार नाहीत, याची जशी काळजी घेत, तशीच काळजी व्यक्तिगत व राजकीय चारित्र्याच्या बाबतीतही घेत. सत्ता येते, जाते. पैसे येतात, जातात; परंतु जीवाभावाची जोडलेली माणसेच कायम बरोबर राहतात, हा त्यांचा जीवनमंत्र. रेड इंडियन्स लोकांनी अमेरिकन लोकांसाठी वापरलेले एक वचन आबांनी उद्धृत केलं होतं, 'जोपर्यंत शेवटचं झाड मरत नाही, शेवटची नदी सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही, तोपर्यंत या माणसांना कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही,' हे ते वचन. पैशाच्या मागे लागलेल्या, प्रमाणापेक्षा अधिक धनसंचय करणार्यांना आबा किती साध्या उदाहरणातून पैशापेक्षा तळागाळातील माणसे अधिक महत्त्वाची असतात, ते सांगून गेले. राजकारणात साधनशूचिता, तात्त्विकता राहिलेली नाही, असे नेहमी म्हटले जाते. त्यांच्यासाठी आबा हे एक उदाहरण म्हणून दिले, तर आश्चर्य वाटणार नाही. राजकारणाच्या पलीकडे एक सहृदयी माणूस म्हणून त्यांचे मोठेपण कायमच लक्षात राहील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment