0

जवान अद्याप फरार
सांगोला / तालुका प्रतिनिधी
गेल्या आठ महिन्यापूर्वी शेतजमिनीच्या वादातून उदनवाडी (ता. सांगोला) येथे सैनिकाने केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेच्या खून प्रकरणातील फरारी आरोपी भगवान नामदेव पांढरे (३५) यास काल शुक्रवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने मिरज (जि. सांगली) एस. टी. स्टँड परिसरात ताब्यात घेतले. आरोपी भगवान नामदेव पांढरे यास शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून याच गुन्ह्यातील बिरा नामदेव पांढरे हा सैन्यातील जवान अद्याप फरार आहे. उदनवाडी (ता. सांगोला) येथे दि. १९ जुलै २0१४ रोजी सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून सैन्य दलातील जवान बिरा नामदेव पांढरे यांनी केलेल्या गोळीबारात उज्वला जयवंत पांढरे (२६) ही महिला जागीच ठार झाली होती तर दत्तात्रय तातोबा पांढरे, अर्जुन तातोबा पांढरे, जयवंत तातोबा पांढरे, कुसूम दत्तात्रय पांढरे, सुमन अर्जून पांढरे हे पाचजण गोळीबारात जखमी झाले होते. या प्रकरणी दत्तात्रय तातोबा पांढरे यांनी बिरा नामदेव पांढरे याच्यासह पांढरे कुटुंबीयातील अकरा महिला व पुरुषांवर सांगोला पोलिसात फिर्याद दिली होती. घटनेनंतर पोलिसांनी अकरापैकी नऊ आरोपींना अटक केली होती तर दोघेजण घटनेपासून फरार झाले होते. दरम्यान, या गुन्ह्यातील फरारी आरोपी भगवान नामदेव पांढरे हा कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण परिसरात गवंडीची कामे करीत असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महादेव कुंभार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार शिवाजी परांडे, आबासाहेब मुंढे, शिवाजी जाधव, पोलीस नाईक प्रविण वाळके यांचे पथक आरोपीच्या मागावर होते. शनिवारी भगवान पांढरे हा आरोपी खाजगी वाहनाने मिरजकडे जात असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान, या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बिरा नामदेव पांढरे हा जवान घटनेपासून बंदुकीसह फरार आहे.

Post a Comment

 
Top