आ.भारत भालके प्रशांत परिचारककेंद्रात आणि त्यानंतर राज्यात भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या आघाडीवरून विरोधकांची अवस्था पाहिल्यानंतर प्रवेशाच्या उड्या घेण्याच्या मनोकामना कार्यकर्त्यांपासून नेतेमंडळींपर्यंत व्यक्त होणे साहजिक आहे. प्रवाहाबरोबर राहताना तिथेही आपलाच वरचष्मा असावा या 'दूरदृष्टीने' पंढरपूर विभागात भाजपा प्रवेशासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच प्रवेशाचा मुहूर्त मात्र निघत नसल्याने नुसतेच गुर्हाळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विधानसभेला गतवेळी प्रथमच सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने अनेकांची पक्षीय उमेदवारीची अधुरी इच्छा पूर्ण झाली. असे असले तरी देशात आणि राज्यात अभूतपूर्व यश मिळविलेल्या भाजपाला पंढरपूर विभागात मात्र भोपळाच हाती लागल्याचे स्पष्ट झाले. एकतर या परिसरातील जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्या. त्या निवडून आल्या नाहीतच, पण ज्या ठिकाणी पक्षाचा उमेदवार राहिला तेथेही मागच्या रांगेत रहावे लागले. राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यानंतर पक्षाच्या पदाधिकार्यांना उभारी मिळाली, मात्र मित्रपक्षांकडील नेतेमंडळी अस्वस्थ झाली. त्यातूनच किमान प्रवाहाबरोबर राहून अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेकजण भाजपा प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. प्रत्यक्षात कोणाच्याच प्रवेशाचा मुहूर्त निघत नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ होवू लागले आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून 'स्वाभिमानी'कडून लढलेले प्रशांत परिचारक यांनी गेल्या कांही दिवसांत संघटनेशी सुरक्षित अंतर ठेवल्याचे जाणवू लागले आहे. त्यातूनच त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगत आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या तिकीटावर बाजी मारलेले आ. भारत भालके हे ही स्व:पक्षात फारशा जोशात नसल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. एकतर निवडणुकीपासूनच काँग्रेसचे नियोजन राहिले नाही, आणि विरोधात असताना धडाडीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे, अपेक्षा पूर्ण करू शकतील, असे नेतृत्वच पक्षाकडे नसल्याच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. अशावेळी कामाचा आणि गतिमान आमदार अशी ओळख असलेले आ. भालके मतदारसंघाच्या भल्या मोठय़ा अपेक्षा कशा पूर्ण करणार? असा प्रश्न उपस्थित करून प्रसंगी आ. भालके हेच भाजपाशी सलगी करतील, अशी आरोळीही अधून-मधून उठू लागली आहे. नुकतेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ना. रावसाहेब दानवे यांनी अनेक आजी-माजी आमदार, पदाधिकारी प्रवेशाच्या उंबरठय़ावर असल्याचे सांगितले होते. पंढरपूर, माळशिरस, माढा या मतदारसंघातील अनेकांची नावे भाजपा प्रवेशासाठी पुढे येत आहेत. यामध्ये भाजपाच्या मित्रपक्षांची नेतेमंडळी अग्रक्रमावर असल्याचे बोलले जात आहे. ऊस, कांदा अन् डाळिंब दराच्या प्रश्नांवर सरकारविषयी शेतकर्यांमध्ये रोष वाढत चालला असताना दिल्लीच्या निकालाने आणखी तेल ओतले आहे. महाराष्ट्रातही सत्तेत आलेल्या सेना-भाजपाच्या कुरबुरी दररोज कानावर पडत आहेत. या सगळय़ा पार्श्वभूमिवर शेतकर्यांच्या प्रश्नांवर लढणारे नेते प्रवेश करतील का? अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्यांचे प्रवेश घडणार की बिघडणर? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
- समाधान गायकवाड, पंढरपूर
Post a Comment