सोलापूर - सत्तरफूट रस्त्यावर महिबूब सुबानी दर्ग्याजवळ भाजी घेऊन जाताना राधाबाई वायलाल (वय ६५, रा. भंडारी कारखान्यासमोर, न्यू पाच्छा पेठ) यांचे तीन तोळ्यांचे दागिने तरुणाने दमदाटी करून हिसकावले. तो पळून जाताना आरडाओरड करताच परिसरातील पाच नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तीन तोळ्यांचा सोन्याचा गोफ, खड्याचे पदक त्या महिलेला परत दिले.
बालाजी पेंटप्पा यल्ला (वय ३५, नवीन विडी घरकुल) याला अटक झाली आहे. शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती फौजदार केरू जाधव यांनी दिली. यल्ला हा लूम कारखान्यात काम करतो. आज सकाळी श्रीमती राधाबाई भाजी घेऊन घरी पायी जाताना बाजारपेठेपासून काही अंतरावर एका बोळातून जाताना बालाजीने त्यांना दमदाटी करत गळ्यातील गोफ हिसकावला. त्या आरडाओरड करताच त्या भागातील शरणप्पा मद्री, जालिंदर भरले, श्रीनिवास वन्नम, प्रभाकर सामल, देवीदास बोद्धूल यांच्यासह काही कामगार, नागरिक यांनी बालाजीचा पाठलाग सुरू केला. अर्धा किलोमीटर अंतरावर त्याला पकडले. त्यांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर हवालदार दीपक कारटकर, भारत गायकवाड, बाळासाहेब कोबरे या गस्त पथकाने बालाजीला ताब्यात घेतले.
पाच जणांचा गौरव करणार
नागरिकांच्यामदतीने चोराला पकडण्यात आले आहे. या पद्धतीने नागरिकांची मदत झाल्यास पोलिसांच्या कामात गती येईल. नागरिकांनी पोलिसांना मदत करावी. चोराला पकडण्यासाठी पाचजणांनी मदत केली असून त्यांचा पोलिस ठाण्यात बोलावून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एफ. ए. काझी यांनी दिली.
महिलेचा आवाज आला आणि मदतीसाठी धावलो
चोरटादागिने घेऊन पळून जाताना ज्येष्ठ महिला मदतीसाठी आरडाओरड करताच आम्ही धावत गेलो. मी मंदिरात दर्शनसाठी आलो होतो. अन्य काही नागरिकही होते. सर्वजण आम्ही चोराचा पाठीमागे धावत गेलो. सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग सुरू होता. चोराला पकडल्यानंतर आम्हालाही त्याने धक्काबुक्की केली. तरीही आम्ही त्याला पकडून ठेवले. दागिने घेऊन त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले. अर्धा तोळे दागिने गहाळ झाले होते तेही शोधून दिल्याची माहिती शरणप्पा मद्री यांनी दिली. त्यांच्याशिवाय जालिंदर भरले, श्रीनिवास वन्नम, प्रभाकर सामल, देवीदास बोद्धूल यांचीही मदत मिळाली. नागरिकांनी अशा पध्दतीने सतर्कता दाखवल्यास चोऱ्यांवर अटकाव येण्यास वेळ लागणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment