विधानसभेचं अधिवेशन, दुष्काळ-गारपीट यामुळे झालेलं नुकसान. टिव्हीवर शेतकऱ्यांची रडारड.. संपादकांचे शेतकऱ्यांना सल्ले या गदारोळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुन्हा एकदा चर्चेला आल्यायत. काहीतरी इवेन्ट झाल्याशिवाय कुणाचंच लक्ष जात नाही, हे लक्षात आल्यामुळे शेतकरीही कुठेतरी कुणाला एसएमएस- व्हॉट्सऍप वरून मेसेज पाठव.. स्वत:चा व्हिडीओ संदेश रेकॉर्ड कर किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे फोटो सोशल मिडीया वर व्हायरल करून आपल्या दु:खाकडे सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे.
मध्यंतरी एका शेतकऱ्याने सोलापूरात थेट गांधी पुतळ्यालाच दोर लटकवून फाशी घेतली. काल- परवा एक मोबाईल क्लीप पाहिली. एक जण एका छोट्या बिल्डींगवर चढला होता आणि खाली तुफान गर्दी.. अचानक त्या माणसाने त्या इमारतीवरून उडी टाकली. व्हिज्युअल्स पाहिले, बातमी मध्ये विज्युअल्स वापरू नका अशा सूचना दिल्या आणि कामाला लागलो. असे आत्महत्या किंवा मृत्यूचे ‘ लाइव’ फुटेज ही काही नवीन बाब नाही. आपल्याही संवेदना संपत चालल्यायत का असं प्रश्न पडतो. रोज 3-4 फोटो किंवा व्हिडीओ क्लिप येत असतात ज्यात कुणी तरी झाडावर, पंख्याला लटकून जीव दिल्याचं दिसत असतं. शांत पणे बसून विचार करताना लक्षात आलं पोलिसांच्या भावना, जाणीवा – संवेदना का बोथट होत असाव्यात.
माझ्या करीअरच्या सुरूवातीपासूनच अनेक वेळा मृतदेह पाहिले. ओडीशातलं सुपर सायक्लॉन कव्हर करायला गेलो होतो तेव्हा तर बातमीदारी सोडून मृतदेह शोधायचं आणि विल्हेवाट लावायच्या कामाला लागलो. कुणाला वाचवण्याचं काम शिल्लक राहिलं नव्हतं पण चक्रीवादळानंतर कित्येक महिने मृतदेह सापडत राहिले. सुरूवातीला हळहळ वाटायची, पण नंतर नजर सरावून गेली. नैसर्गिक आपत्ती असल्याने हळहळ आणि आपण या निसर्गचक्रात किती छोटे- असहाय्य असतो असं सारखं वाटत राहायचं. नंतर खूप घटना घडत गेल्या..गुजरातची दंगल.. तिथे कापलेल्या – जाळलेल्या मृतदेहांचा वास कधी कधी नाकात अजून असल्याचा भास होतो.. तिथल्या मृतदेहांना बघून निसर्गापेक्षा माणूसच जास्त क्रूर असावा असं वाटायला लागलं. सुरतच्या सिविल हॉस्पॉलटलच्या पोस्ट मॉर्टेम हॉल मध्ये दारू पिऊन एक वॉर्डब्वॉय करवतीने कसं मृतदेहांची छाती फाडत होता हे दृश्य कधीतरी अचानक डोळ्यासमोर येऊन जातं. कधीकाळी तोऱ्याने मिरवणारा माणूस मेल्यावर लगेच डेडबॉडी होऊन जातो. अशा खूप बॉडी पाहिल्यावर आपणची आतल्या आत मरत असतो. बाहेर कुणाच्या लक्षात येत नाही, कदाचित आपल्याही लक्षात येत नाही.
लातूरला एका स्टींग ऑपरेशन निमित्त शूट वर असताना रस्त्यात खूप गर्दी दिसली. एक सफारी गाडीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. गाडीत एक तरूण होता, तो आत अडकला होता, त्याला लोकांनी बाहेर काढला पण पोलीसांची भानगड नको म्हणून रस्त्यावर झोपवून ठेवला होता. आम्ही त्याला आमच्या गाडीत घेतलं, आणि लातूर सिविलच्या दिशेने सुसाट निघालो. तोपर्यंत फोनाफोनी केली,पत्रकार असल्याची सर्व ताकद लावून डॉक्टर- पोलीस जमवले.. पण हॉस्पीटलच्या कंपाऊंड मध्ये शिरताच त्याने शेवटचा श्वास घेतला. स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जात असताना अपघात होऊन तो तरूण मेला. त्याला डोळ्यासमोर मरताना पाहून सुन्न झालो. गर्दीने एक तास त्याला रस्त्यावर झोपवलं.... कदाचित कायमचंच....
डोळ्यासमोर मृत्यूमुखी पडलेल्यांचे असे अनेक चेहरे स्पष्ट- अस्पष्ट पणे आठवतात. जीव कासावीस होतो. एक छोटी बातमी करा.. व्हिज्युअल्स ब्लर करा.. या बातमीला मोठं करा.. खोलात जाऊन शोध घ्या अशा सूचना देऊन कधी कधी बातमीशी संबंध संपतो.. कधी कधी फक्त अरेरे....असं म्हणून पुढच्या मोठ्या बातमीकडे निघून जातो.
ग्रामीण भागातील जीवन हा माझा आवडीचा विषय, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप फिरलो. विदर्भात जास्त. नेहमीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या कानावर येत असतात. त्यांचं प्रमाण वाढलं की मी दौरा काढतो. नेमक्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाच्या पुढे असहाय्यता हे एक कारण आहेच, पण या आत्महत्या मानवनिर्मीत पण आहेत. या आत्महत्या अपघात ही आहेत आणि हत्या ही.. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय म्हणजे अधिवेशनातल्या चर्चेतल्या शेवटचा दिवस आणि बातम्या नसल्या की हमखास चालवायचा अजेंडा असं काहीसं स्वरूप. दुष्काळ, नापिकी,कर्ज, राजकारण्यांचे आरोप- प्रत्यारोप, स्कीम-योजनांची आस हे विषय अनुषंगाने येतात, पण त्यावर फार गंभीर चर्चा होताना दिसत नाही. रोज मरे त्याला कोण रडे अशी काहीशी स्थिती दिसते.
मध्यंतरी कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मृत्यू यावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून झालेलं प्रचंड कव्हरेज पाहून मला एका शेतकऱ्याने फोन केला. ‘रवीजी, रागावणार नसाल तर एक विचारू.. जीवाची किंमत सारखीच तर मग शेतकऱ्याच्या आत्महत्येवर का नाही शो करत. फक्त आकडा का सांगता ? तीन लोकांनी आत्महत्या केली आणि चार लोकांनी केली म्हणून..’ साधी साधी माणसं तुम्हाला निरूत्तर करून जातात. मी त्याला उगीचच सांगत बसलो, ‘तसं नाहीय. मी सलग दोन तास शो केला एक.. मारेकरी सरकार नावाचा. घटनेने जगण्याचा अधिकार दिलाय. शेतकऱ्यांची आत्महत्या हा घटनेने दिलेलं संरक्षण नाकारण्याचा प्रकार असल्याने सरकारवर एफआयआर व्हायला पाहिजे अशी मागणी पण मी केलीय....’..... राज्यघटनेचं आर्टीकल 21 ... अलाहाबाद हायकोर्टाचं ऑब्जर्वेशन.... वगैरे वगैरे.... कदाचित त्या शेतकऱ्याला आपण सरकारी यंत्रणेतल्याच कुणातरी माणसाला फोन लावल्यासारखं वाटलं असावं.. त्याने फोन ठेवला.. त्याचं फोन कट करणं मलाही समजलं. मी पण असहाय्य आहे असं वाटलं.
हळूच एक प्रसंग आठवला.. आत्महत्यांवर मी केलेली एक डॉक्युमेंटरी आमच्या तेव्हाच्या संपादकांनी जवळपास 8 महिने थांबवून ठेवली होती. खूप मागे लागलो. नाही चालवली. मग अचानक एकदा दिल्ली हून फोन आला. मला खूप झापलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत आणि तुम्ही झोपा काढताय वगैरे वगैरे.. मला समजेनाच काय झालं. आपलं काय चुकलं. मग माहित पडलं राहुल गांधींनी लोकसभेत कलावतीची कहाणी सांगीतली आणि अचानक शेतकऱ्यांचा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न म्हणून चर्चेला आला.. माझ्या डॉक्युमेंटरीला मुहूर्त मिळाला.. त्या दिवशी रात्री उशीरा दिल्लीतल्या एका सहकाऱ्याचा फोन आला, ‘अबे नाराज है क्या.. बॉस के गुस्से का बुरा नहीं मानना चाहीए.. तुम्हारी डॉक्युमेंटरी अच्छी थी लेकिन उसमें दर्द थोडा कम था इसलिए रोकी थी.. अब चलाने के लिए इवेन्ट मिल गया हैं... लो देखो कैसे चल रही हैं बार बार...’
तेव्हाही मी असाच फोन कट केला होता..
मी मराठीचे संपादक रवींद्र आंबेकर
Post a Comment