मंगळवेढा
शेलेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. एका हातपंपाला गावातील सर्वजण पाणी नेण्यासाठी येत होते. हे पाणी देखील क्षारयुक्त असल्याने त्याचा त्रास होत होता. विद्यार्थ्यांच्या दातावर परिणाम झाल्याचे शिक्षक गजानन लिगाडे यांनी दाखवून दिल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत काय करावे अशी उलटी विचारणा केली, तेव्हां लिगाडे यांनी आपण नवीन बोअर मारुन चांगले पाणी आहे का पाहून चांगले पाणी विद्यार्थ्यांना देवू असा विचार व्यक्त केला. यावर ग्रामस्थांनी होकार देत लोकवर्गणीला सुरुवात केली. हजार रुपयापासून सुरुवात झाली, अनेकांनी जमेल त्या पद्धतीने लोकवर्गणी दिली. पाहता-पाहता ही रक्कम पन्नास हजार रुपयापर्यंत गेली. मग गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बोअर मशीन आणून शाळेच्या आवारात बोअर मारण्यात आला. सदहेतूने दिलेली वर्गणी व सदहेतूने केलेले कार्य व लहान मुलांना पिण्याचे पाणी देण्याचे भाग्य ग्रामस्थांकडून चांगलेच उजाळून निघाले. २६0 ते २८0 फूट बोअर मारल्यानंतर साडे चार इंची असे मुबलक पाणी मिळाले. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला आहे. ऐन उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळणार असल्यामुळे ग्रामस्थांतून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. सरपंच भागवत चव्हाण, तुकाराम चव्हाण, शरद चव्हाण, नानासो करपे, महादेव चव्हाण, मनोज चव्हाण, सिद्धेश्वर चव्हाण, तात्या मगर, आनंदराव चव्हाण, पंडित चव्हाण, श्रीरंग सावंत, दादा चव्हाण, नवनाथ काळुंगे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या चांगल्या कामाचे गटविकास अधिकारी दत्ताजीराव दराडे,गटशिक्षणाधिकारी दशरथ यरवळकर, विस्तार अधिकारी हणमंतराव कोष्टी, केंद्रप्रमुख मधुकर पवार यांनी कौतुक केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment