मोहोळ / शहर प्रतिनिधी
आज खर्या अर्थाने जनतेला शरद पवारांच्या विचारांची व नेतृत्वाची गरज भासत आहे. कारण जिल्हय़ातीलच नव्हेतर राज्याच्या जनतेला आता कळून चुकलंय की आपण सत्ता नको त्या व्यक्तींच्या हातामध्ये सोपविली आहे, यामुळे सामान्य जनता नाराज असून, यामुळे भविष्यात राष्ट्रवादीच्याच हाती राज्याचा कारभार जनता देईल, असा आशावाद माजी पालकमंत्री तथा आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या शेटफळ येथील लिटल मास्टर इंग्लिश मिडियम स्कूल येथे आयोजित केली होती. त्यावेळी अध्यक्षपदावरून सोपल बोलत होते. प्रारंभी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी प्रस्तावना करताना पक्षामध्ये असलेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे कामाला लागावे, जिल्हय़ामध्ये जास्तीत जास्त पक्षाची सभासद नोंदणी करावी, असे आवाहन प्रत्येक तालुकाध्यक्षांना केले. या बैठकीमध्ये जिल्हय़ातील सर्वच तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अडचणी श्रेष्ठींसमोर मांडल्या. यावेळी आ. दिपक साळुंखे, आ. बबनदादा शिंदे यांनाही मार्गदर्शन केले. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षामध्ये जनतेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने भरपूर काम केले आहे, मात्र याचे श्रेय दुसर्या पक्षाचे नेते घेत आहेत. यामुळे आपल्या पक्षाने जनतेसाठी किती काम केले आहे. हे कार्यकर्त्यांनी जनतेस लक्षात आणून द्यावे, असे ते यावेळी म्हणाले. बैठकीचे नियोजन मोहोळ पं.स. चे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी केले होते. या बैठकीसाठी संजय शेळके, राजू खडके, भांगे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment