ऑगस्ट व सप्टेंबर 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित
मे ते जुलै 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका 22 एप्रिललाच
मुंबई, दि. 27: राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या 8 हजार 108 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी ऑगस्ट आणि सप्टेंबर 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. उर्वरित मे ते जुलै 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि सर्व पोटनिवडणुका पूर्वनियोजनाप्रमाणे 22 एप्रिल 2015 रोजीच होतील; तर स्थगित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यथावकाश जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले, की जून ते सप्टेंबर 2015 या कालावधीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा असल्यामुळे त्यावेळी निवडणुकांसाठी पुरेसे पोलिसबळ उपलब्ध होऊ शकणार नाही; तसेच केंद्राकडून राज्याला मिळणारे अर्धसैनिक दलदेखील मिळणार नाही. त्यामुळे त्या कालावधीत निवडणुका घेऊ नयेत, अशी पोलिसांकडून विनंती करण्यात आली होती. म्हणून मे ते जुलैसोबतच ऑगस्ट व सप्टेंबर 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका 22 एप्रिल 2015 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आताच घेण्यात येऊ नयेत, अशा भावना विधिमंडळ सदस्यांनी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या भावनांचा आदर करून आणि कुंभमेळ्याच्या काळातही निवडणुकासांठी पुरेसे पोलिसबळ उपलब्ध करून दिले जाईल, असे पोलिस महासंचालकांनी आश्वासित केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यांचा निवडणूक कार्यक्रम यथावकाश स्वतंत्ररीत्या जाहीर केला जाईल.
कुंभमेळा आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या बंदोबस्तासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी फेरआढावा घेतला आहे. कुभभेळ्यासाठी लागणाऱ्या पोलिसबळाचे नियोजन आणि पोलिसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात फेरबदल करून बंदोबस्ताचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन नियोजनामुळे कुंभमेळ्याच्या कालावधीतदेखील निवडणुकांसाठी पुरेसे पोलिसबळ उपलब्ध करून देण्यात अडचण उद्भवणार नाही, असे पोलिस महासंचालकांनी आश्वासित केल्याचे श्री. सहारिया यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 340 ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यांत म्हणजे 24 व 30 एप्रिल 2015 रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातील केवळ चार ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट व सप्टेंबर 2015 मध्ये संपत असल्यामुळे त्यांच्याही निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 336 ग्रामपंचायतींच्या निवडणुका मात्र नियोजित 24 व 30 एप्रिल 2015 रोजीच होतील, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
Post a Comment