पंढरपूर / तालुका प्रतिनिधी
ऊस, दूध यानंतर आता केळी, टोमॅटो तसेच इतर शेतीमालाचे दर कोसळल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांना बुरे दिन आले आहेत. ऊसाला यंदा १ हजार ७00 रूपयांचा हप्ता मिळाल्याने निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकर्यांना आता केळी, टोमॅटोचे दर कोसळल्याने चांगलाच हादरा बसला असून, या परिस्थितीतून उत्पादन खर्च तरी निघेल का? या चिंतेत शेतकरी आहे. गेल्या महिनाभरात केळीचे दर ७ ते ८ रूपयांनी खाली आले आहेत. मंगळवार दि. १४ रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विक्रीसाठी आलेल्या केळीला १२५ रूपये ते २११ रूपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. उत्पादन खर्च निघून चार पैसे हातात रहावेत अशी त्याची अपेक्षा असते.टोमॅटो १, कोबी २ तर वांगी ३ रूपये किलोमात्र, दर कोसळल्याने माल आणण्यासाठी लागणारे मोटार भाडे देण्यासाठीही पैसे शिल्लक राहत नाहीत अशी परिस्थिती आहे. बुधवार दि. १५ रोजी पंढरीत टोमॅटो १ रूपया, कोबी २ रूपये, वांगी ३ रूपये, काकडी २.५0 पैसे, मिरची १0 रूपये, कोथिंबीर ५0 पैसे पेंढी, मेथी २ रूपये इतका दर मिळाला. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. असे असले तरी याचा फायदा हा थेट ग्राहकाला होताना दिसून येत नाही. बाजारात केळी २0 ते २५ रूपये डझन, टोमॅटो ८ ते १0 रूपये, कोबी १0 रूपये किलो तर वांगी २५ ते ३0 रूपये किलो दराने विकली जात आहेत. गेल्या वर्षी उन्हाळ्यात सर्व भाजी पाल्याचे भाव कडाडलेले होते. यंदा मात्र, त्याच्या उलट परिस्थिती असल्याचे आडत व्यापारी मकसुद बागवान यांनी सांगितले. ऊसाचा दर खाली आल्याने शेतकरी हे केळी तसेच इतर भाजीपाला पिकांकडे वळले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment