*माहिती संकलन*
सतीश बागल, अतुल मोरे, अण्णासाहेब पवार, सचिन शिंदे, चंद्रकांत माने, विलास सलगर
पंढरपूर तहसीलदारांचा दरारा नाही
पंढरपूर : तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या धडक कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले होते. वाळू तस्करी करणार्या व तस्करांना मदत करणार्यांच्या ७/१२ उतार्यावर थेट बोजा चढविण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनाचा तस्करांवर वचक होता. परंतु, सध्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अद्यापही वाळू तस्करीच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे तालुकापातळीवरील प्रशासनानेही मनावर घेतले नाही. किंबहुना तहसिलदारांच्या कारवाईशून्य भूमिकेमुळे पंढरपूर तालुक्यात 'भीमा'काठी तस्करांनी अक्षरश: थैमान घातल्याचे वास्तव आहे. पंढरपूरचे तहसिलदार गजानन गुरव यांनी रुजू झाल्यापासून गौण खनिज विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाळू, मुरूम तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या. भीमा नदीच्या पात्रातून वाळू तस्करीचे स्तोम माजले आहे. गुरव यांनी एकही मोठी धाडसी कारवाई न केल्यामुळे वाळू तस्करांवर त्यांचा दरारा निर्माण झाला नाही. तालुक्यात दोन ठिकाणी वर्षभराच्या कालावधीत वाळूवरून हाणामारीच्या घटना घडूनही प्रशासन गंभीर झाले नाही. तहसिलदारांनी कधी नदीपात्रात उतरण्याची तस्दी घेतली नाही. वाळू हा या तालुक्यातील कळीचा व संवेदनशील मुद्दा असतानाही त्यांनी आपल्या प्रशासनालाही याबाबत कडक भुमिका घेण्याचा धडा दिला नाही. त्यामुळे प्रशासनावर त्यांचा अंकुश निर्माण झाला नाही. ढिसाळ प्रशासनामुळे सध्या भीमा नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरूच आहे. यातून नदीकाठच्या गावात गुन्हेगार निर्माण होत आहेत. गावागावत धुसफूस वाढत असून याचा स्फोट केव्हाही होवू शकतो. वाळूच्या तस्करीचा मुद्दा पंढरपूर तालुक्यात अतिसंवेदनशील बनत चालला असून महसूल प्रशासन तो प्रश्न हाताळण्यात साफ अपयशी ठरल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. गावोगावी बेसुमार अवैध वाळू उपसा होत असल्यामुळे भीमा नदीचे नैसर्गिक पात्र नाहीसे होत आहे. जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणामुळे भीमाकाठचा शेतकरी गेल्या २0 वर्षात सुखी झाला होता. परंतु, आता नदीत वाळूच राहिली नाही तर पाणी थांबणार नाही. धरणातून कितीही पाणी सोडले तर ते थांबणार नाही. त्यामुळे पुन्हा शेतकर्यांना वाईट दिवस येतील. वाळू तस्करीचे स्तोम वेळीच रोखले नाही तर नदीकाठचा शेतकरी उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा प्रशासनाने वेळीच कडक भूमिका घेतली नाही तर 'पोहरगांव'सारख्या घटना पुन्हा पुन्हा घडतील अशी भिती सर्वसामान्य नागरिकांना आहे. जिल्ह्यात 'जलयुक्त शिवार अभियान', प्रगत शेती, शेतकर्यांच्या कर्जाला प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घेतलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे 'भीमा' नदी व नदीकाठ वाचविण्यासाठी नक्कीच प्रय▪करतील, अशी आशा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना आहे.
Post a Comment