0

गारपीट हवेतच रोखणारं मशीन बांधावर !

बुलढाणा:अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक कहाण्या आपण पाहिल्या/ऐकल्या असतील. पण संकटावर मात करायची इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो, याचचं उदाहरण बुलडाण्याच्या दादाराव हटकर या शेतकऱ्याने दाखवलं आहे.
 
गारपीटीमुळे पिकाचं होणारं नुकसान लक्षात घेता, हटकर यांनी शेतात गाररोधक यंत्र (स्केलर वेव्ह जनरेटर) बसवलं आहे.  या यंत्रामुळे चार किलोमीटरपर्यंतच्या परिसरात गारपीट होत नाही.  जर गारपीट झाल्यास, त्या गारांचं रुपांतर हे पाण्यामध्ये होतं.
 
हटकर यांनी हे मशीन पुण्याहून आणून शेतात बसवलं आहे. विदर्भातील शेतीत प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे.
 
गारा तयार होण्याची प्रक्रिया थांबवतं
 
गाररोधक यंत्रणेत स्कॅलर लहरी आहेत. या लहरी आकाशाकडे सोडल्या जातात. गारपिटीवेळी या यंत्राची ढगाच्या दिशेने सेटींग करावी लागते. या सेटिंगनंतर गारा तयार होण्याची प्रक्रिया थांबवता येते, असा दावा करण्यात आला आहे.
 
या यंत्रामुळे संत्र्याच्या आकारातील म्हणजेच मोठ्या गारांचं अतिशय लहान गारांमध्ये रुपांतर होतं. याशिवाय पावसाच्या वेगावरही नियंत्रण मिळविता येतं.
 
विजेची आवश्यकता नाही
 
या यंत्रात लोखंड, तांबे, अँल्युमिनियम यासारख्या धातूंचा वापर केला आहे. हे यंत्र धातू विश्‍वातील स्कॅलर एनर्जी शोषून घेतात. या यंत्रासाठी विजेची आवश्यकता नाही. यंत्रांची वायर जमिनीला जोडली असता यंत्र सुरू होते. वजन ५0 किलोपर्यंत असल्यामुळे हे यंत्र हलविण्यास सोपे आहे. लहरी निघणार्‍या सर्व दिशेने पाईप फिरविता येत असल्याने हाताळण्यास हे यंत्र अतिशय सुलभ आहे.
 
या यंत्राची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. छोट्या शेतकऱ्यांनी मिळून हे यंत्र शेतात बसवल्यास, गारपीटीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी मदत होऊ शकेल.

Post a Comment

 
Top