0

टँकर न दिल्याने ग्रामपंचायतही हतबल

तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडीत सध्या पाण्याची फार मोठी टंचाई जाणवत आहे. दहिवडीच्या लक्ष्मीदेवीला महाराष्ट्र व कर्नाटकच्या कानाकोपर्‍यातून शुक्रवार, मंगळवार व रविवार यादिवशी फार मोठय़ा प्रमाणावर दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. परंतु, पाण्याअभावी भाविकांचे मोठे हाल सध्या सुरू आहेत. सध्या सर्वत्रच पाण्याची गंभीर समस्या जाणवत आहे. त्यामध्येच दरवर्षी लक्ष्मीदहिवडीला पाण्यासाठी टँकरची सोय करावी लागते. मात्र, यंदा जिल्हाधिकार्‍यांनीच टँकर दिले नसल्याने व गावात पाण्याची सोयही नसल्याने अधिकार्‍यांनाही काय करावे समजेनासे झाले आहे. लक्ष्मीदहिवडी परिसरात सध्या फार मोठी पाणी टंचाईची झळ बसत असून देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांचे हाल होत आहे. ग्रामपंचायतकडून ही गावात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सध्या बाहेरून येणार्‍या भाविकांना 'कुणी पाणी देता का पाणी' असे म्हणण्याची वेळ आली आहे. गावच्या परिसरात पाण्याचे स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. तरी प्रशासनाने दखल घेऊन टँकरची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे.

Post a Comment

 
Top