४७ लाखाचा ठोठावला दंड मंगळवेढय़ात प्रथमच मोठी कारवाई
मंगळवेढा / प्रतिनिधी पोलीस व महसुल प्रशासनाने रात्रीच्यावेळी सिध्दापूर (ता. मंगळवेढा) येथील भिमा नदीच्या पात्रातून विनापावती व ओव्हरलोड वाहतूक करणार्या ३0 ट्रक पकडून महसुल प्रशासनाने ३५ लाखाचा तर उपप्रादेशिक परिवहन खात्याने १२ लाखाचा असा एकूण ४७ लाखाचा दंड ठोठावल्याने वाळू तस्करी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवेढय़ाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाली आहे. सिध्दापूर येथील भीमा नदीच्या पात्रातील वाळूचा जाहीर लिलावा झाला असून गौणखनिज खात्याने वाळू उपसणेबाबत नियमावली घालून दिली आहे. मात्र, सदर ठेकेदाराकडून रात्रीच्या वेळी वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हा महसुल प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर मंगळवेढय़ातील पोलीस खाते व महसुल प्रशासन यांनी दि. १६ रोजी रात्री १२ ते सुर्याेदयापर्यंत सांगली, कोल्हापूरकडे वाळू घेवून जाणारे ३0 ट्रकची तपासणी केली असता. या ट्रकचालकांकडे पावत्याच नव्हत्या. तर कांही ट्रकचालकांनी ३0 टनापर्यंत वाळू भरल्याचे आर.टी.ओ. अधिकार्यांकडून सांगण्यात आले. मंगळवारी दिवसभर महसुल प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन खाते कारवाई करण्यात मग्न होते. ३0 ट्रकचे वजन केले असता ५00 टन वाळू अधिक असल्याचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राजू नांगरे व अतुल नांदगावकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या गाड्यांना १२ लाखांचा दंड ठोठावला. तर महसुल प्रशासनाकडून तहसिलदार पुनाजी कोथेरे यांनी या गाड्यांना ३५ लाखाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, वाळूच्या गाड्या पोलीस स्टेशन आवारात आणल्यानंतर वाळूचे दलाल दिवसभर सभोवताली घुटमळत होते. कांही गाड्या चालकांना पोलीस स्टेशन आवारात आणल्यानंतर मॅनेज करून पावत्या व तारीख टाकून देण्यात आल्याची दिवसभर चर्चा होती. सुर्यास्तानंतर वाळू उपसा करण्यास गौणखनिज नियमाप्रमाणे बंदी आहे असे असतानाही संबंधित ठेकेदार बिनधास्तपणे रात्रंदिवस वाळू उपसा करून शासनाची लाखो रूपयाची लुट करीत असल्याचे आजच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मंगळवेढय़ातून रोज जवळपास २५0 गाड्या सांगली, कोल्हापूर भागाकडे वाळू वाहतूक करीत असतात. मात्र, मंगळवेढा महसुल प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. दि. १५ रोजी संध्याकाळी सांगोल्याचे तहसिलदार श्रीकांत पाटील वाळूतस्करीच्या कारवाईच्या मोहिमेत असताना आंधळगावनजीक एका ढाब्यावर ४0 ते ५0 गाड्या कारवाई होईल या भीतीपोटी थांबल्या होत्या. याबाबत तहसिलदार पाटील यांनी थेट जिल्हाधिकार्यांना माहिती कळविली, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विभागीय पोलीस अधिकारी किशोर करांडे, पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, तहसिलदार पुनाजी कोथेरे, फौजदार शिवाजी विभुते, सहाय्यक फौजदार प्रभाकर पाटील यांच्यासह एक पोलीस व्हॅन, महसुलचे मंडल अधिकारी दत्तात्रय कांबळे व तलाठी पांडूरंग धनवडे, कोतवाल मारूती चव्हाण असा फौजफाटा रात्रभर वाहने पकडून पोलीस स्टेशन आवारात आणून लावत होता.
Post a Comment